पुणे : सध्या पुण्यामध्ये शुद्ध श्वास घेणे अत्यंत अवघड बनले आहे. वाढती वाहने, सिमेंटीकरणाचा पेव, कार्बन उत्सर्जन आदी कारणांमुळे पुण्यात गेल्या वर्षभरातील दहा महिने पुणेकरांना प्रदूषित हवा घ्यावी लागली. केवळ दोन महिनेच शुद्ध हवेचा श्वास घेता आला. जुलै-ऑगस्ट महिन्यामध्येच प्रदूषणरहित हवा मिळत आहे, अशी आकडेवारी केंद्रीय वने, पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे माजी सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘लोकमत’ला दिली.
शहरामध्ये शिवाजीनगर, स्वारगेट या भागामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी पाहायला मिळते आणि त्याच भागात प्रदूषणाची पातळी अधिक आहे. वाहनांमधून निघणारा धूर पुण्याला प्रदूषित करत आहे. या प्रदूषित हवेमुळे पुणेकर सातत्याने आजारी पडत आहेत. प्रत्येकाला काही तरी त्रास जाणवत आहे. पूर्वी पुण्याला ‘हिल स्टेशन’चा दर्जा होता. येथील हवा कायम स्वच्छ व प्रदूषणविरहित होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये प्रदूषणात वाढ झाली. पुण्यात श्वास घेणे म्हणजे दिवसातून २.८ सिगारेट पिण्याइतके हानिकारक ठरत आहे.
केवळ ६२ दिवस चांगले !
गेल्यावर्षी ३६६ दिवसांपैकी २११ दिवस अधिक प्रदूषण, ९३ दिवस साधारण प्रदूषण तर केवळ ६२ दिवस चांगले होते. फेब्रुवारी महिना हा २९ दिवसांचा असल्याने एक दिवस अधिक होता.
* जानेवारीत ३१ पैकी ३१ दिवस प्रदूषित
* फेब्रुवारीत २९ पैकी २९ दिवस प्रदूषित
* मार्चमध्ये ३१ पैकी ३१ प्रदूषित
* एप्रिलमध्ये ३० पैकी ३० दिवस प्रदूषित
* मे महिन्यात १७ दिवस जास्त तर १४ दिवस कमी प्रदूषण
* जूनमध्ये २० दिवस चांगले, ९ दिवस साधारण प्रदूषित, तर १ दिवस अधिक प्रदूषण
* जुलैमध्ये २३ दिवस चांगले, ८ दिवस समाधानकारक.
* ऑगस्टमध्ये ८ दिवस चांगले, २२ दिवस समाधानकारक, तर १ दिवस प्रदूषण
* सप्टेंबरमध्ये ९ दिवस चांगले, २१ दिवस साधारण प्रदूषण
* ऑक्टोबरमध्ये २ दिवस चांगले, १० दिवस समाधानकारक तर १९ दिवस प्रदूषण
* नोव्हेंबरमध्ये २८ दिवस प्रदूषित, तर २ दिवस जास्त प्रदूषण
* डिसेंबरमध्ये ९ दिवस समाधानकारक प्रदूषण, १९ दिवस प्रदूषण तर ३ दिवस जास्त प्रदूषण.
प्रदूषके आणि उत्सर्जनाची कारणे :
* वर्षातील ३६६ दिवसात सर्वाधिक प्रदूषण धूलिकण २.५चे होते आणि पीएम १०चे प्रदूषण १५० दिवसांचे होते.
* नायट्रेस ओकसाइडचे (NO2) प्रमाणात १०० दिवस अधिकचे आढळले.
* कार्बन मोनोकसाईडचे (CO) अधिक प्रमाण ९६ दिवस आढळले.
वाहनांमधून बाहेर येणारा धूर, कचरा जाळणे, बांधकामातील धूळ आणि पेट्रोलियम पदार्थांच्या ज्वलनातून बाहेर येणारे घटक यामुळे पुण्यातील प्रदूषणात भर पडत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांची संख्या आणि बांधकामे प्रचंड वाढली आहेत. - प्रा. सुरेश चोपणे, माजी सदस्य, केंद्रीय वने, पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय, दिल्लीपुण्यात प्रदूषणाचे प्रमाण खूपच वाढले आहे. शिकागोत एक अभ्यास झाला, त्यात स्पष्ट झाले की, भारतात खूप प्रदूषण वाढले आहे. यामुळे माणसाचे आयुष्य सहा वर्षांनी कमी झाले आहे. आता ठोस धोरण करणे आवश्यक आहे. चीनमध्ये खूप बदल घडवून आणले आहेत. वाहनांची संख्या कमी करून सार्वजनिक वाहनांचा वापर करायला हवा. प्रवास करताना मास्क वापरावा. काही प्रमाणात त्याचा फायदा होईल. बांधकामांवर सक्तीने काही नियम, अटी लावाव्यात जेणेकरून प्रदूषणात भर पडणार नाही. जुनी वाहने बाद करावीत तरच प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल. - डॉ. स्वप्नील कुलकर्णी, फुप्फुस विकारतज्ज्ञ
प्रदूषणावर उपाय?
- एअर प्युरिफायरचा वापर करा
-कारमध्ये फिल्टर लावा
- दुचाकीवर एन ९५ मास्क घाला
-आजूबाजूला झाडं असू द्या
धोका काय?-दमा, अस्थमा असणाऱ्यांना, श्वसनास त्रास होतो. खोकला, सर्दी, छातीत दुखते. डोळे चुरचुरणे.