पुणे : पुणे शहरात चांदणी चौकातील कामाचे केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प तसेच खेड व मंचर रस्ता चौपदरीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमही झाला. आजच्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी लोकार्पण झालेल्या चौकाचा उल्लेख चांदणी चौक केला. पण आता या चौकाला चांदणी चौक म्हणता येणार नाही. यापुढे या चौकाला एनडीए चौक म्हणून संबोधले जाईल.
याबद्दलचे एक ट्विट सरंक्षण विभागाने केले आहे. त्यामध्ये म्हंटलं आहे की, १२ ऑगस्ट २०२३ रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी NDA चौक राष्ट्राला समर्पित केला आहे. NDA चौकात भारतीय लष्कराचा टँक T - 55, भारतीय वायुसेनेची MIG - 27 विमाने आणि विमानवाहू वाहकांचे स्केल केलेले मॉडेल आहेत.
आजच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते. पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुण्यात ५० हजार कोटींचे पूल हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे उभारण्यात येतील आणि पुणे-बंगळुरू आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
एकात्मिक वाहतूक व्यवस्था गरजेची- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. पुणे मेट्रोने 'पुणे वन कार्ड' द्वारे चांगली सुरुवात केली आहे. हे कार्ड पीएमपीएमएललाही लागू होईल अशी व्यवस्था केल्यास त्याची उपयुक्तता वाढेल. भविष्यात देशातील इतर मोठ्या शहरातही या कार्डचा उपयोग होऊ शकेल. पुण्यात एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करून ५०० मीटर वर नागरिकांना विविध वाहतूक पर्याय दिल्यास ते सार्वजनिक वाहतुकीचा जास्त उपयोग करतील. आता स्मार्ट सिस्टीम तयार करण्यात येणार असल्याने बसेसची वेळ, स्थान, प्रवासी संख्याही कळू शकेल.
पुण्यात १० किलोमीटर जाण्याचा वेळ ३० ते ४० मिनिटे आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल. पुण्यातून वेगवेगळ्या शहरात जाणाऱ्या रस्त्यांमुळे शहरात वाहतूक कोंडी होते. उन्नत रस्ते तयार करून ही समस्या दूर करता येईल. केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून यासाठी राज्य शासनही यासाठी आपला वाटा उचलेल.