पुणे : लॉकडाऊनचे नियम आणखी कडक करून देखील पुणेकर नागरिक सकाळी भाजीपाला आणि दूध खरेदीसाठी बाहेर पडताना दिसून आले आहेत. पोलीस प्रशासनाने दूध वितरण घरपोच करण्यास बंदी घातली आहे. तसेच भाजीपाला यांची विक्री करण्यास मनाई केली असताना अनेकांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन करताना पाहावयास मिळाले. विशेषत: शहरातील प्रमुख पेठांमध्ये सकाळी दहा ते बारा च्या दरम्यान नागरिकांनी रस्त्यावर भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केली होती. काही ठिकाणी सोशल डिस्टन्स नसल्याचे चित्र कायम होते. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिसरात २३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ पर्यंत पूर्णपणे मनाई आदेश लागू केले आहेत. या काळात या ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी १२ पर्यंत या वेळेत दूध विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी सकाळी दहा ते बारा च्या दरम्यान नागरिक नेहमीप्रमाणे भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडले. शिवाजीनगर गावठाण, कसबा पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ याशिवाय उपनगरांमध्ये देखील भाजीपाला विक्री सुरू होती. अनेक ठिकाणी भाजीपाला, फळविक्रेते यांनी हातगाड्या लावून विक्री केल्याचे निदर्शनास आले. यावेळी सोशल डिस्टन्सचे उल्लंघन होत असल्याचे कुणाच्या लक्षात येत नव्हते. अत्यावश्यक सेवा म्हणून औषध विक्रीची दुकाने सुरू होती. पिठाच्या गिरण्या, किराणा मालाची दुकाने सुरू ठेवून त्याबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती. शहराच्या उपनगरात देखील तीच परिस्थिती असल्याचे पाहावयास मिळाले. केशवनगर, वडगाव शेरी, औंध, याठिकाणी नागरिक भाजीपाला आणि किराणा घेण्यासाठी घराबाहेर पडत होते. विशेष म्हणजे शहरात कोरोना संक्रमणशील भाग म्हणून घोषित करण्यात आलेल्या विविध ठिकाणी देखील नागरिक बेजबाबदारपणे घराबाहेर पडून भाजीपाल्याची खरेदीसाठी रांगेत उभे होते. ......................* प्रशासनाकडून भाजीपाला आणि किराणा माल यांची विक्री करण्यासाठी जी वेळ देण्यात आली आहे ती टळून गेल्यानंतर देखील नागरिक आपल्याला वस्तू मिळतील या आशेवर दुकानाबाहेर उभे असल्याचे यावेळी दिसून आले. आम्हाला नियमानुसार जास्त वेळ दुकान सुरू ठेवण्यास परवानगी नाही. तेव्हा नंतर या.असे दुकानदाराने आवाहन करून देखील त्याकडे नागरिक दुर्लक्ष करून दुकानाबाहेर थांबत होते...........* आम्ही काय करायचे ? रोज नवीन सूचना, नियम आणि आदेश पोलीस काढतात. अशावेळी नागरिकांनी काय करायचे हा प्रश्न आहे. भाजीपाला आणि दूध या रोज लागणा?्या गोष्टी आहेत. किराणा माल एक दोन दिवसाआड खरेदी करता येतो. मात्र तो प्रत्येकाला दिलेल्या वेळत खरेदी करता येईल असे नाही. अशावेळी गर्दी होते. नागरिकांनी सोशल डिस्टन्स ठेवावे. दुकानासमोर कमी जागा असल्यास नागरिकांनी त्या सुचनेचे कसे पालन करायचे ? - एक महिला नागरिक ( नारायण पेठ)
पालथ्या घड्यावर पाणी म्हणण्याची 'हीच' ती वेळ ! पोलिसांनी खरेदीला मनाई करून देखील पुण्यात नागरिकांची रस्त्यांवर झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 1:30 PM
सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करत शहरांतील प्रमुख पेठांमध्ये भाजीपाला विक्री सुरू
ठळक मुद्देशहरातील दहा पोलिस ठाण्यांच्या परिसरात २३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ पर्यंत पूर्णपणे मनाई आदेश