पुणे: उन्हाचा पारा हळूहळू वाढू लागला असून, उष्णतेच्या झळा पुणेकरांना बसू लागल्या आहेत. आतापर्यंत हवामानातील झालेल्या बदलामुळे थंडी आणि उष्णता अशा दोन्ही हवामानाचा अनुभव पुणेकरांना मिळत होता. पण आता थंडी कमी झाली असल्याने उष्णतेच्या झळा सुरू झाल्या आहेत. लोहगावला कमाल तापमान ३७ अंशावर पोचल्याने त्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.
शहरातील वातावरणात बदल होत असल्याने पुण्यातील तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पुढेच जात आहे. दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके जाणवत आहेत. यंदा हवामान विभागाने मार्च आणि एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचा अंदाज दिला आहे. तसेच उष्णतेची लाट देखील येऊ शकते, असा इशारा दिला आहे.
गेल्या पंधरा दिवसांमध्ये पुण्यातील तापमान थंड असल्याचे जाणवत होते. आता किमान तापमान देखील वाढत आहे. आज मगरपट्टा, कोरेगाव पार्क या ठिकाणचे किमान तापमान २२ अंशावर नोंदवले गेले. तर शिवाजीनगरल १६.५ अंश सेल्सिअस तापमान होते. तर आज दुपारी शिवाजीनगरला कमाल तापमान ३५.८, पाषाणला ३६, लोहगावला ३७.३ आणि मगरपट्ट्यात ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.