पुणे : पुणे शहरामध्ये मंगळवारी (दि.२१) सकाळी किमान तापमानात वाढ होईल आणि ढगाळ वातावरण तयार होईल. त्यानंतर बुधवारी (दि.२२) शहरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे.
राज्यामध्ये किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारी उष्णता जाणवत आहे. पुणे शहरात देखील दुपारी खूप गरम होत होते. थंडीमध्ये अशा प्रकारचे हवामान पुणेकरांसाठी नवीनच आहे. दिवाळीत केवळ दोन दिवस थंडी पडली आणि त्यानंतर किमान तापमानात वाढ झाली. सध्या किमान तापमान १६ ते २० च्या दरम्यान नोंदवले जात आहे.
पुढील ४८ तासांत आकाश निरभ्र राहणार असून, पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. २३ नोव्हेंबरनंतर हळूहळू ढगाळ वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे. २४ नोव्हेंबर रोजी हलक्या पावसाचा अंदाज आहे. २५ व २६ रोजी देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. २७ नोव्हेंबर नंतर ढगाळपणा हळूहळू कमी होईल. त्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमानात लक्षणीय घट होईल.
राज्यात दोन दिवसांपासून अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. हवेतील गारठा कमी झालेला दिसून येत आहे. राज्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.२३) कोकणातील सिंधुदूर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या, ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे.
पुणे शहरातील किमान तापमान
एनडीए : १६.००शिवाजीनगर : १७.४हडपसर : १९.००कोरेगाव पार्क : २०.५मगरपट्टा : २२.२वडगावशेरी : २२.६