पुणे : शहरासह राज्यामध्ये कमाल व किमान तापमानामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नोव्हेंबरमधील थंडी कुठेही जाणवत नाही. उलट थंडीच्या काळात गरमी जाणवत आहे. या हवामान बदलाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना खोकला, ताप, सर्दी होत आहे. अरबी समुद्रात ढगांची निर्मिती झाली असून, त्यामुळे महाराष्ट्रातील सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर परिसरात पावसाचा अंदाज आहे.
दरवर्षी दिवाळीपूर्वीच थंडीचा कडाका जाणवत असतो. परंतु, यंदा मात्र दिवाळी आली तरी देखील थंडी पडायच्या ऐवजी गरमी होत आहे. राज्यात किमान व कमाल तापमान वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कोकणात कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांच्या वरच असून, उर्वरित राज्यातही कमाल तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी (दि. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात उन्हाची ताप अधिक असल्याने डहाणू येथे उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस, उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३२ ते ३५ अंशाच्या दरम्यान नोंदवले गेले आहे.
ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ कायम असून, बहुतांश ठिकाणी पारा १५ अंशाच्या वरच आहे आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने मंगळवारी (दि. ७) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पावसाची इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ढगांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे गोव्यापासून ते कोकण, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पुणे, जिल्ह्यातही काही भागात पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात ११ नोव्हेंबरनंतर ढग जाऊन आकाश निरभ्र राहणार आहे. ७ ते ९ ढगाळ वातावरण पुण्यात राहील. हलका पावसाची शक्यता आहे. - अनुपम कश्यपी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र अंदाज विभाग, पुणे