पुणे : कोणत्याही निवडणुकीत बंडखोरीला फार महत्त्व येते. अनेकदा बंडखोर अपेक्षित विजयी उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरतात किंवा स्वपक्षाच्या उमेदवाराचा पराभव करतात. मात्र, शहरात तसे काहाही झाले नाही. बंडखोरांचा फारसा प्रभाव पडलाच नाही.
प्रामुख्याने महाविकास आघाडीतच व त्यातही काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली होती. शिवाजीनगर मतदारसंघात मनीष आनंद, तर कसबा मतदारसंघात कमल व्यवहारे यांनी काँग्रेसच्या उमेदवारांसमोर आव्हान निर्माण केले होते. पर्वती मतदारसंघात काँग्रेसच्या आबा बागुल यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या अश्विनी कदम यांना आव्हान दिले होते. त्याशिवाय कोथरूड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पदाधिकारी विजय डाकले यांनी बंडखोरी केली होती.
या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यावर त्यांच्या पक्षांनी लगेचच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मात्र, त्यांना निवडणुकीत फारशी मते मिळालीच नाहीत. विजयी उमेदवारांच्या मतांच्या तुलनेत तर ते एकदमच मागे पडले. शिवाजीनगरमध्ये मनीष आनंद यांना १३ हजार २८ मते मिळाली. बागुल यांना १० हजार ४७६ मते मिळाली. कमल व्यवहारे यांना फक्त ५५२ मते मिळाली. विजय डाकले यांना ११२५ मते मिळाली. त्यामुळे पुणेकर मतदारांनी बंडखोरांना अजिबात थारा दिला नाही, असे मतदानातून दिसून आले.