पुणे: लोहगाव विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू होऊन सहा महिने झाले, तरी या ठिकाणावरून अजूनही ७० ते ८० टक्केच विमान उड्डाणे सुरू आहेत, तर जुन्या टर्मिनलवरून ३० टक्के उड्डाणे होत आहेत. अखेर नवीन टर्मिनलमध्ये ‘इमिग्रेशन’ कार्यालय स्थलांतरास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे नव्या वर्षात नवीन टर्मिनलमधून आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह देशांतर्गत सर्व उड्डाणे होणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना अत्याधुनिक सुविधा मिळणार असून, प्रवास सुखाचा होणार आहे.
लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २२ जुलैपासून विमान उड्डाणे सुरू करण्यात आली. सुरुवातीला केवळ दोन कंपन्यांना या ठिकाणावरून उड्डाणांसाठी परवानगी देण्यात आली होती. नंतर त्यात वाढ करण्यात आली. सध्या येथून ७० ते ८० टक्केच उड्डाणे सुरू आहेत, तर २० ते ३० टक्के उड्डाणे जुन्या टर्मिनलवरून सुरू आहेत. जुन्या विमानतळावरील ‘इमिग्रेशन’ कार्यालय नवीन टर्मिनल येथे हलविण्यासाठी आवश्यक परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवीन टर्मिनलमध्ये हलविण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना नवीन टर्मिनलच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत होते.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात इमिग्रेशन कार्यालयाचे स्थलांतर
प्रवाशांकडून सर्व उड्डाणे नवीन टर्मिनलवरून सुरू करण्याची मागणी केली जात होती; परंतु विमानतळ प्रशासनाकडून ‘इमिग्रेशन’ व ‘डीजी यात्रा’ सुरू करण्यासाठीच्या आवश्यक परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुरू होती. अखेर ‘इमिग्रेशन’ कार्यालय नवीन टर्मिनलमध्ये हलविण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने हे कार्यालय हलविण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत इमिग्रेशन कार्यालय नव्या टर्मिनलमध्ये हलविण्याचे काम होणार आहे. त्यानंतर जुन्या टर्मिनलवरील सर्व उड्डाणे नव्या टर्मिनल येथून होणार आहेत. यामुळे पुणेकरांचा लवकरच सर्व अत्यावश्यक सुविधांसह आनंददायी प्रवास होणार आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढणार...
पुणे विमानतळावरून सिंगापूर, दुबई आणि बँकॉक या तीन ठिकाणी प्रत्येकी एक आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू हाेणार आहेत; परंतु जानेवारी महिन्यात सिंगापूर आणि दुबईला दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढणार आहे. याचा फायदा पुणेकरांना होणार आहे.
डिजीयात्रा सुरू होण्याची शक्यता....
डिजीयात्रा सेवा ही ॲपवर आधारित आहे. ॲपमध्ये सर्व माहिती उपलब्ध असल्यावर प्रवाशांना सुरक्षा तपासणीसाठी रांगेत थांबायची गरज लागत नाही. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून ‘डीजीयात्रा’ योजना विमानतळांवर राबविली जात आहे. पुणे विमानतळावरील जुन्या टर्मिनलवर ही सेवा सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू होती. आता ही सेवा कायम स्वरूपासाठी जुन्या टर्मिनलवर सुरू आहे. नवीन टर्मिनलवरही डीजीयात्रेसाठी जानेवारी महिन्यांत परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा विमान प्रवाशांना होणार आहे.
जुन्या टर्मिनलचा विकास होणार...
जुन्या टर्मिनलमधील इमिग्रेशन कार्यालय नवीन टर्मिनलमध्ये हलविण्यास सुरुवात केली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर इतर विमान कंपन्यांची काही शिल्लक कार्यालयांचे साहित्य हलविण्याचे पूर्ण झाल्यानंतर जुन्या टर्मिनलच्या विकासाचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच, जुन्या टर्मिनलच्या समोर असलेले केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) कार्यालय आणि पोलिस चौकीचे नव्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर जुन्या टर्मिनलचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
इमिग्रेशन कार्यालय नवीन टर्मिनलमध्ये हलविण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. नव्या वर्षात नवीन टर्मिनलवरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह सर्व उड्डाणे होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. - संतोष डोके, संचालक, पुणे विमानतळ