लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सलग दहा महिन्यांपासून एकही वीजबिल न भरणाऱ्या पुणे परिमंडलातील ७९ हजार ९१६ लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी गेल्या दोन आठवड्यांत थकबाकीपोटी ११३ कोटी २२ लाख रुपयांचा भरणा केला आहे.
पुण्यातील वीजबिल भरणा राज्यात सर्वाधिक ठरला आहे. प्रामुख्याने १ एप्रिल २०२० पासून वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई ‘महावितरण’ने सुरु केली. या पार्श्वभूमीवर वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा सुरु केला आहे. उर्वरीत राज्यात देखील ५ लाख ७४ हजार ४१० लघुदाब ग्राहकांनी वीजबिल थकबाकीचे ७४९ कोटी रुपये भरले आहेत.
पुणे परिमंडलात जानेवारी २०२१ पर्यंत सलग गेली १० महिने वीजबिल न भरणाऱ्या लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांची एकूण संख्या ३ लाख ९९ हजार १२८ होती. त्यांच्याकडे एकूण ५२६ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी होती. यात घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक ३ लाख ३१ हजार ८७ तर थकबाकी देखील ३२० कोटी ३६ लाख रुपये होती. मात्र ग्राहकांनी गेल्या १ फेब्रुवारीपासून वीजबिलांची थकबाकी भरण्यास सुरवात केली आहे. गेल्या दोन आठवड्यांत राज्यात सर्वाधिक प्रतिसाद देत पुणे परिमंडलातील ७९ हजार ९१६ थकबाकीदारांनी ११३ कोटी २२ लाख रुपयांचा भरणा केला.
चौकट
४१३ कोटींची थकबाकी
सद्यस्थितीत पुणे परिमंडलात सलग १० महिन्यांपासून एकही वीजबिल न भरणाऱ्या लघुदाब ग्राहकांची संख्या ३ लाख १९ हजार २१२ आहे. त्यांच्याकडे ४१३ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे.