लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरात कोरोनाची दुसरी लाट आली असून, तिचा विस्तार वेगाने वाढत आहे. मात्र, त्याचवेळी नागरिकांची बेफिकिरीही वाढत चालली आहे. त्यामुळे पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. सध्या विनामास्क फिरणाऱ्या पुणेकरांवर दररोज ६ लाख रुपयं दंड वसूल केला जात आहे. १९ मार्चअखेरपर्यंत २ लाख ५६ हजार ८२१ जणांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून १२ कोटी ४४ लाख ११ हजार रुपये दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे.
जानेवारी महिन्यापासून शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांनी विनामास्क कारवाईचा वेग वाढविला. शहरातील विविध चौकात पोलीस विनामास्क जाणाऱ्यांवर अडवून कारवाई करीत आहेत. पोलिसांच्या दंडाच्या भीतीलाही न जुमानता लोक सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत आहेत.
.......
शुक्रवारी १९ मार्च रोजी दिवसभरात पोलिसांनी १ हजार ३६४ जणांकडून ५ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा दंड वसुल केला आहे.
त्याचवेळी ग्रामीण पोलिसांनी १ हजार ३९० जणांवर कारवाई करून ४ लाख ७४ हजार २०० रुपये दंड वसूल केला आहे.
...........
शहरातील मॉल, हॉटेल, मंगल कार्यालयांवरही पोलिसांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. एका मंगल कार्यालयात एका माननीयांच्या लग्नात परवानगी दिलेल्यापेक्षा अधिक जणांचा सहभाग आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच २ हॉटेलवरही कारवाई करण्यात आली आहे.
... २६ दिवसांत १ कोटी ३८ लाख दंड वसूल
शहरातील वाढत्या कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी शहर पोलिसांनी विनामास्कची कारवाई २२ फेब्रुवारीपासून वाढविली. २२ फेब्रुवारी ते १९ मार्च दरम्यान पोलिसांनी २८ हजार २६१ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून १ कोटी ३८ लाख रुपये दंड वसूल केला आहे.
.......
......
शहरातील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मास्कने नाक व तोंड व्यवस्थित कव्हर होईल, याची काळजी घ्या. पोलीस कारवाईपेक्षा सर्वांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे