पुणे : खडकवासला प्रकल्पातील सर्व धरणे आणि इतर पाणी साठ्यात मिळून पिण्यासाठी १५ जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी राखून ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण पाणीसाठ्यातून सुमारे ७.४ टीएमसी पाणी पुणे महापालिकेला देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पुणे शहरावरील पाणीकपातीची टांगती तलवार तूर्त दूर झाली आहे.
याचबराेबर ग्रामीण भागाच्या शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी ६.९ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे दोन उन्हाळी आवर्तने देण्याचे निश्चित केले आहे. कालवा समितीच्या शनिवारी (दि. २४) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी कालवा सल्लागार समितीत पाणीसाठ्याचा आढावा घेतला. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, दत्तात्रय भरणे, राहुल कुल यांच्यासह विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप उपस्थित होते.
गतवर्षीपेक्षा ३ टीएमसी पाणी कमी :
- यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा सुमारे ३ टीएमसीने कमी आहे.
- सध्या या प्रकल्पात १६.१७ टीएमसी पाणी उपलब्ध असून, गेल्या वर्षी पुणे महापालिकेला उन्हाळी हंगामादरम्यान मार्च ते १५ जुलैअखेर सुमारे ७.८ टीएमसी पाणी दिले होते. त्यामुळे यंदा पाणीसाठा कमी असल्याने पुणे शहरातही पाणीकपात केली जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.
- मागील (नोव्हेंबरमध्ये झालेल्या) कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आढाव घेत अजित पवार यांनी ‘पाण्याची स्थिती पाहून फेब्रुवारीमध्ये निर्णय घेऊ. तोपर्यंत पाणी काटकसरीने वापरा’ अशा सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार जलसंपदा विभागासह महापालिका प्रशासनाने पाणी बचतीचे उपाय अमलात आणले आहेत.
महापालिकेने केलेल्या पाणीबचतीमुळे शहरात तूर्त पाणीकपात होणार नाही, असे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतून स्पष्ट झाले. तसेच पुणे शहरासाठी १५ जुलैपर्यंत पिण्यासाठी लागणारे पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यासाठी ७.४ टीएमसी पाणी वापरण्यात येणार आहे.
दररोज १४० एमएलडी पाण्याची बचत :
महापालिका यापूर्वी खडकवासला धरणातून दररोज १ हजार ६०० एमएलडी पाणी उचलत होती. जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पाणीबचतीचे उपाय सुचविले होते. जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार आता १ हजार ४६० एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. या नियोजनानुसार महापालिकेला पुढील १४४ दिवसांसाठी ७.४ टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे. तेवढे पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
ग्रामीण भागाला दोन आवर्तन :
पाणीसाठा कमी असल्याने ग्रामीण भागाला केवळ रब्बी आवर्तनच मिळेल, असे सांगितले जात होते. मात्र, पाणीबचतीच्या उपायांमुळे आता दोन उन्हाळी आवर्तने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिले उन्हाळी आवर्तन ४.३ टीएमसी, तर दुसरे २.३ टीएमसी आहे. कालव्यांच्या दुरुस्तीमुळे रब्बी हंगामात अर्धा टीएमसीची बचत झाली आहे. तसेच महापालिकेने पाणी कमी उचलल्यानेही पाणीबचत झाली आहे. परिणामी ग्रामीण भागाला दोन उन्हाळी आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागासाठी एकूण ६.९ टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. पहिले उन्हाळी आवर्तन ४ मार्चपासून सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन ४५ दिवस चालणार आहे. दुसरे उन्हाळी आवर्तन ५ मेपासून सोडण्यात येईल. त्याचा वापर दौंड नगरपालिका आणि इतर पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात येणार आहे.
फुरसुंगी बोगदा, टेमघरबाबतही आश्वासन :
फुरसुंगीपर्यंत बोगदा करून कालव्याचे पाणी पुढे नेल्यास मोठी पाणीबचत होणार आहे. यामुळे सिंचनासाठी अधिकचे पाणी उपलब्ध होईल. पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागाने संयुक्तरीत्या याबाबत चर्चा करून, या प्रकल्पासाठी आर्थिक तरतुदीच्या अनुषंगानेही प्रस्ताव तयार करावा. या बैठकीत टेमघर धरणातून होत असलेल्या पाणीगळतीच्या अनुषंगाने ग्राउटिंग आणि इतर उपाययोजना करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले. यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पुणे महापालिकेने पाणी गळतीच्या उपाययोजना राबवून पाणीबचत करावी, असे निर्देश अजित पवार यांनी यावेळी दिले. जलसंपदा विभाग व महापालिकेने स्वतंत्र बैठक घेऊन उपाययोजना करावी, असेही पवार यांनी सुचविले. त्यानुसार पुढील आठवड्यात ही बैठक घेण्यात येईल.
- श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प