- विवेक भुसे
पुणे :पोलिस नियंत्रण कक्षातील फोन खणखणतो, सर, या ठिकाणी दारू विक्री सुरू आहे. येथे मटका, जुगार चालू आहे. तातडीने ही माहिती संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रमुखांना तसेच मार्शलला पाठविली जाते. पोलिस तेथे जातातही; पण त्यांना तेथे काहीही आढळून येत नाही. फेब्रुवारी महिन्यात तब्बल १२० वेळा अवैध धंदे सुरू असल्याचे पुणेकरांनी कळविले. मात्र, त्यापैकी केवळ ८ ठिकाणीच पोलिसांना तसे आढळून आल्याने तेथे कारवाई केली गेली. त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो, की जे पुणेकरांना दिसते. ते पोलिसांना दिसत नाही का?
पोलिस आयुक्तालयातील पोलिस नियंत्रण कक्षाला सातत्याने फोन येत असतात. दिवसभरात साधारण ५५० ते ६०० कॉल येतात. त्यात काही कॉल हे अवैध धंदे सुरू असल्याबाबतची माहिती देणारे असतात. हे कॉल मिळाल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रमुखाला तसेच त्या परिसरातील पोलिस मार्शलला कळविले जाते. त्यानुसार पोलिस संबंधित ठिकाणी जातात. अनेकदा त्यांना हे ठिकाण सापडत नाही. काही वेळा तर ज्यांनी कॉल करून माहिती दिली. त्यांनाच तेथे काही नाही. तुम्ही येऊन ठिकाण दाखवा, असे कळविले जाते.
याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिस नियंत्रण कक्षात आलेल्या प्रत्येक कॉलवर कारवाई केली जाते. अनेकदा एकाच वेळी अनेक कॉल येतात. संबंधित ठिकाणापासून मार्शल लांब असतात. अवैध धंद्यांविषयीचा कॉल लवकरात लवकर अटेंड करावा, अशा सूचना असतात. तशी स्टेशन डायरी करावी लागते.
फेब्रुवारीत आलेले कॉल
अवैध दारू विक्री - १२
गांजा विक्री - ४
ड्रग्ज विक्री - १
जुगार, मटका - १०० हून अधिक
केलेली कारवाई
* पेरणे डोंगराजवळ लोणीकंद पोलिसांनी कारवाई करून अवैध दारू जप्त केली.
* गणेश पेठेत मटका सुरू असल्याचे समजल्यावर फरासखाना पोलिसांनी कारवाई केली.
* भारती विद्यापीठ रस्त्यावर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समजल्यावर पोलिसांनी कारवाई केली.
* भारती विद्यापीठ परिसरात दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
* खराडी येथे दारू विक्रीची माहिती मिळाल्यावर चंदननगर पोलिसांनी दारू जप्त केली.
* जुगार अड्डा सुरू असल्याचे समजल्यावर वानवडी पोलिसांनी कारवाई केली.
* दारू विक्रीची माहिती मिळाल्यावर येरवडा पोलिसांनी महिलेला अटक केली.
* जुगाराबाबत माहिती मिळाल्यावर विमानतळ पोलिस आल्याचे पाहून लोक पळून गेले.
या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक कॉल
वानवडी - १२
विश्रांतवाडी व येरवडा - १०
चंदननगर व लोणी काळभोर - ८
स्वारगेट -७
कोंढवा - ६
मुंढवा व बंडगार्डन - ४