पुणे : शहरातील हौशी रेडिओ परवाना धारक यांनी २७ डिसेंबर रोजी दुपारी १२.५० वाजता नासाच्या अवकाश स्थानकाकडून येणारी स्थिरचित्रे बाणेर येथील तुकाई टेकडी वरील मंदिराजवळ यागी अँटेनाद्वारे ग्रहण केली. ही छायाचित्रे पाहण्याचा आनंदच वेगळा असून, ही घटनाही दुर्मीळच आहे.
हौशी रेडिओ वापरकर्त्यांचा अवकाश स्थानकाद्वारे संवाद (ARISS) या उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा कार्यक्रम ‘नासा’ने आखला होता. अवकाश स्थानक पृथ्वीभोवती फिरते. ते फिरताना आपल्या देशाच्या वरूनही जाते. तेव्हा पुण्यातून काही वेळा त्यांचे छायाचित्रे ग्रहण करण्याची संधी मिळते. असे उपक्रम अनेक देशांत होतात. ‘नासा’कडून त्याची माहिती दिली जाते.
या कार्यक्रमात १३ वर्षाच्या शाळकरी मुलापासून ते ७२ वर्षाच्या तरुणांच्या वयोगटातील सर्व उत्साही सामील झाले. सर्वानी मास्कचा वापर व उन्हासाठी टोपी घातली होती. तसेच करोना प्रतिबंधासाठी एकमेकात योग्य ते अंतर राखले होते. आठ मिनिटात चांगली दोन चित्रे मिळाल्याचा आनंद सर्वानी अल्पोपहाराने साजरा केला.
अवकाशस्थानकाच्या दररोज पृथ्वीला ९० प्रदक्षिणा
अवकाश स्थानक दररोज पृथ्वीला ९० प्रदक्षिणा घालते. पुण्याचा वाट्याला दिवसात केवळ २ किंवा ३ प्रदक्षिणा अतिशय थोड्या वेळ येतात. त्यामुळे ही संधी अचूक वेळी साधायची असते. ही संधी पुणेकर हॅम मंडळींनी अथक प्रयत्नांनी साधली. मंगेश पाटील व विलास रबडे यांनी उपस्थितांना सर्व प्राथमिक माहिती दिली व शंका समाधान केले.