पुणे : मुठा नदी पुनरुज्जीवनासाठी कापण्यात येणाऱ्या झाडांबाबत येत्या ८ मे रोजी महापालिका हरकती घेतलेल्या नागरिकांचे म्हणणे ऐकणार आहे. त्याविषयावर सकाळी १० वाजता सुनावणी घेण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून बंडगार्डन येथील नदीकाठी सुशोभीकरणासाठी हजारो झाडं अडथळा ठरत होती. म्हणून ती काढण्यासाठी पालिकेने वृत्तपत्रात जाहिरात देऊन हरकती, सूचना नोंदविण्याचे आवाहन केले होते. त्यावर शेकडो नागरिकांशी हरकती नोंदवल्या आहेत. त्यांना पालिकेने ८ मे रोजी सुनावणी होणार असून, त्याला उपस्थित राहण्याचे पत्र पाठविले आहे. पालिकेचे प्र. सहाय्यक उद्यान अधिक्षक गुरूस्वामी तुमाले यांनी पत्रांवर सही केलेली आहे. या सुनावणीसाठी अनेक नागरिकांना मेलवर आणि व्हाॅटसअपवर नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार, याविषयी पुणेकरांना उत्सुकता लागून राहिली आहे.
पालिकेने बंडगार्डन या ठिकाणी नदीकाठ सुशोभीकरणाला सुरुवात केली आहे. तेथील हजारो झाडे त्यासाठी तोडणार आहेत. परंतु त्याला पुणेकरांचा विरोध आहे. हा विरोध नुकताच चिपको आंदोलन काढून मोठ्या प्रमाणात व्यक्त झाला आहे. त्यामुळे आता महापालिकेला नागरिकांचे म्हणणे ऐकावेच लागणार आहे. कारण या सुशोभीकरणावर साडेचार हजार कोटींचा खर्च होणार आहे. त्यात पुन्हा झाडांवर संक्रांत येत आहे. खरंतर नदीकाठी सुशोभीकरण करण्याऐवजी अगोदर तिला स्वच्छ करावे, अशी पुणेकरांची मागणी आहे. त्यासाठी एसटीपी पूर्ण क्षमतेने उभा करून सुरू करणे आवश्यक आहे. पण महापालिका त्याकडे दुर्लक्ष करून सुशोभीकरणावरच भर का देतेय ? असा सवाल नागरिक विचारत आहेत.