पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील बस दिवसेंदिवस कमी होत असताना नवीन बसची एक वर्षापासून केवळ चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून पीएमपीकडून नव्याने बस घेण्यासाठी केवळ निविदाप्रक्रिया सुरू आहे. यामुळे नव्याने येणाऱ्या ७०० बस प्रत्यक्षात ताफ्यात दाखल कधी होणार? असा प्रश्न प्रवासी आणि संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरएडीच्या हद्दीत पीएमपीकडून प्रवासी सेवा दिली जाते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत १०० स्वमालकीच्या आणि ४०० भाडेतत्त्वावरील सीएनजी बस घेण्यास मान्यता दिली होती. यापैकी ४०० सीएनजी बस खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रत्यक्षात बस दाखल होण्यासाठी किमान तीन-चार महिने लागणार आहेत, तर दुरीकडे स्वमालकीच्या ३०० बस खरेदीची प्रक्रिया अजून सुरू आहे. त्यामुळे नव्या बस ताफ्यात दाखल होण्यासाठी वेळ लागणार आहे. पीएमपीच्या ताफ्यातील बस मार्गावर जास्तीत जास्त १२ वर्षे चालवाव्यात, असा नियम आहे.
पीएमपीकडून ठेकेदारांमार्फत चालविल्या जाणाऱ्या बसची वयोमर्यादा संपल्यानंतर त्यांना वेळेत बाद केले जात आहे. गेल्या काही महिन्यांत ठेकेदारांच्या अडीशेहून बस ताफ्यातून कमी केल्या आहेत. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील बसची संख्या कमी झाल्यामुळे नाइलाजाने मालकीच्या १२ वर्षे जुन्या बस चालविल्या जात आहेत. तरीही बसच्या ताफ्यातील संख्या १८०८ पर्यंत आली आहे. त्यामुळे मार्गावर धावणाऱ्या बसची संख्या घटल्या आहेत. त्याचा परिणाम प्रवाशांना भोगावा लागत आहे.
स्वमालकीच्या ३०० बसची निविदाप्रक्रिया सुरू
पीएमपीकडून अगोदर स्वमालकीच्या १०० सीएनजी बस घेण्यात येणार होत्या. पण, नवीन अध्यक्षांनी पदभार घेतल्यानंतर स्वमालकीच्या ३०० सीएनजी बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बसची निविदाप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही निविदाप्रक्रिया पूर्ण होण्यास आणि नंतर बस ताफ्यात येण्यास काही महिन्यांचा काळ जाणार आहे. प्रत्यक्ष ताफ्यात बस येण्यास किमान सहा महिने लागणार आहे.
अशी आहे आकडेवारी...
पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या बस - ७००स्वमालकीच्या बस - ३००
खासगी बस- ४००
पीएमपी बस खरेदीचा प्रवास
वर्षभरापासून नव्या बस खरेदीची केवळ चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात एकही बस दाखल झाली नाही. पीएमपी प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा फटका पुणेकर प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर बसची संख्या वाढविणे गरजेचे आहे.- जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच
दोन-तीन महिन्यांत बस दाखल होतील
खासगी बसच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाले आहे. लवकरच बस ताफ्यात दाखल होणार आहेत. स्वमालकीच्या बसखरेदीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत बस दाखल होतील. -नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी