पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील गरवारे ते वनाज या मेट्रोचे उदघाटन झाल्यावर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो नागरिकांसाठी सुरु करण्यात आली. उदघाटनानंतर मेट्रो सुरु होणार असल्याचे महामेट्रो प्रशासनाने सांगितले होते. त्यानंतर गेल्या तीन - चार दिवसात ५० हजारांपेक्षा जास्त पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला आहे. नागरिकांच्या उदंड प्रतिसादात मेट्रो सुरु असल्याचे दिसू लागले आहे. पण मेट्रोने जाण्यासाठी स्टेशनच्या तिकीट काउंटरवर नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. परंतु त्यावर उपाय म्हणून महामेट्रो प्रशासनाने घरबसल्या तिकीट मिळवण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
या प्रकारे करा तिकीटाची बुकिंग
मोबाईलमध्ये असणाऱ्या प्ले स्टोर मधून (pune metro app) डाउनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर त्या अँपमध्ये स्वतःची माहिती भरणे बंधनकारक आहे. त्यातच तुम्हाला एक पासवर्ड तयार करावा लागणार आहे. म्हणजे नेहमी अँप उघडताना तो पासवर्ड टाकावा लागेल. अँपमध्ये सध्या सुरु असलेल्या स्टेशनची नावेही देण्यात आली आहेत. नागरिकांना सिंगल आणि रिटर्नचे तिकीटही काढता येणार आहे. मेट्रोच्या तिकिटाप्रमाणेच प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मोबाईलमध्ये डाउनलोड केलेल्या तिकिटाचा कोड स्कॅन करावा लागणार आहे.
मेट्रो संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
मेट्रो स्थानकावर पोहोचल्यापासून ते दुसऱ्या स्थानकातून बाहेर पडण्यापर्यंत संपूर्ण यंत्रणा ही स्वयंचलित करण्यात आली आहे. तिकीट काउंटरवर ऑनलाइन पैसे दिल्यानंतर तिकीट मिळते. त्यानंतर स्वयंचलित यंत्राद्वारे तिकिटावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्लॅटफाॅर्मवर जाण्यास परवानगी दिली जाते. तीन डब्यांच्या मेट्रोला प्रत्येकी चार स्वयंचलित दरवाजे आहेत. आत प्रवेश केल्यानंतर संपूर्ण वातावरण वातानुकूलित होते. त्याचबरोबर चार्जिंग व्यवस्थाही केली होती. प्रत्येक डब्यात एलइडी स्क्रीन असून आपण कोणत्या स्थानकापर्यंत प्रवास करू शकतो याची माहिती दिली आहे. स्वयंचलित दरवाजाच्यावरच एक स्क्रीन आहे त्यावर मेट्रोचा मार्ग, तसेच पुढे कोणते स्थानक आहे याची माहिती दर्शवली जात आहे.