जागतिक हवामान दिन विशेष
विवेक भुसे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहर व जिल्ह्याच्या कोणत्या भागात किती पाऊस पडला, आता तेथील हवामान कसे आहे, ते नेहमीपेक्षा जास्त आहे की, कमी आहे. पुढील काही दिवसात तेथील हवामान कसे असेल, याची माहिती आता पुणेकरांना घरबसल्या त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. हवामान विभाग पुणे जिल्ह्याकरीता स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करीत आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात ते प्रत्यक्ष कार्यन्वित होणार आहे.
पुणे शहर व जिल्ह्यात गेल्या दोन वर्षामध्ये अनेक ठिकाणी अचानक ढगफुटीसारखे प्रकार घडून मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. काही विशिष्ट भागात याचा मोठा परिणाम झाला होता. मात्र, त्या भागात पर्जन्य मापन यंत्रणा नसल्याने नेमका किती, केव्हा आणि किती वेळ पाऊस झाला, याची अधिकृत नोंद होऊ शकली नाही. त्यामुळे हवामान विभागाने शहर व जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंचलित पर्जन्य मापन यंत्रणा बसविण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
याबाबत हवामान विभागाच्या उपकरण विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले की, हवामान विभागाने अर्बन मेट्रॉलॉजी अंतर्गत महानगरांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शहराच्या वेगवेगळ्या भागात स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्र उभारण्यास सुरुवात केली आहे. सध्या महानगरांमध्ये हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानंतर मोठ्या शहरांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.
पुणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या येथील स्थानिक हवामानाची माहिती मिळण्यासाठी हवामान विभाग एक मोबाईल अॅप तयार करीत आहेत. त्यात पुणे शहर व जिल्ह्यातील २५ ठिकाणांच्या हवामानाची माहिती असणार आहे. कमाल, किमान तापमान, पाऊस, पुढील काळातील हवामानाचा अंदाज अशी माहिती लोकांना घरबसल्या मिळू शकणार आहे. हे मोबाईल अॅप तयार करण्याची प्रक्रिया सुरु असून येत्या पावसाळ्याच्या आत ते कार्यन्वित केले जाणार आहे.
संस्थांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता
शहर व जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्र सुरु करण्याचा हवामान विभागाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी स्थानिक महापालिका तसेच संस्था, महाविद्यालये़ कृषीविषयक संस्था, आपत्तकालीन व्यवस्थापन संस्था यांनी पुढाकार घेऊन हवामान विभागाला सुुरक्षित जागा उपलब्ध करुन दिली तर तेथे स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्र सुरु करण्यात येऊ शकते. संस्थांनी जागा दिल्यास तेथे सर्व उपकरणे हवामान विभाग बसवेल. विद्यार्थ्यांना डेटा उपलब्ध होईल. तसेच त्यांना हवामानविषयक मार्गदर्शनही केले जाईल. त्याचा संस्थांना तसेच समाजालाही फायदा होणार आहे. हवामान विभागालाही अधिकाधिक डेटा उपलब्ध होऊ शकेल, असे होशाळीकर यांनी सांगितले.