पुणे : पुणेकरांना तरस पाहण्यासाठी दीड महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे, तर लवकरच झेब्रा ही पहायला मिळणार आहे. त्यासोबत उंच असणारा जिराफ तर परदेशातून येणार आहे. त्यामुळे त्याला जरा यायला उशीरच लागणार आहे. कारण जिराफाला आणायचे तर त्याचे घर नको का करायला छान! त्याची तयारी सध्या सुरू आहे.
ही तयारी कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात होत आहे. त्यासाठी खंदकाचे काम वेगाने करण्यात येत आहे. सध्या तरस, चौशिंगा, आशियाई सिंह, झेब्रा आणि जिराफ यांच्या खंदकाची कामे सुरू आहेत. एखाद्या प्राण्यांचे खंदक म्हणजे घरच. तिथे तो राहणार असतो. त्यामुळे त्याला राहण्यायोग्य जागा तयार करावी लागते. त्यांना आजुबाजुला काय लागते, कोणती झाडं, झुडुपे लागतात, परिसर कसा लागतो, याचा अभ्यास करूनच खंदक तयार केले जाते. जेणेकरून त्या प्राण्याला राहणे सोपे जाईल. त्यावर खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी बराच काळ संशोधन करावे लागते, मग जागा तशी हवी. त्यासाठी विविध ठिकाणी भेटी द्याव्या लागतात आणि मग प्रत्यक्ष खंदकाचे काम सुरू होते. कोणताही प्राणी आणायचा म्हटले की, त्यासाठी परवानगी लागते. अशा अनेक गोष्टींची पूर्तता केल्यावर नवीन प्राणी दाखल होत असतो. एखादा प्राणी इतर ठिकाणाहून नवी ठिकाणी आणला की, त्याला अगोदर काही दिवस काळ्या खोलीत ठेवावे लागते. मग तो हळूहळू तिथल्या वातावरणात स्वतःला सामावून घेतो. नागरिकांनी पाहण्यासाठी खुला करण्यापूर्वी त्यावर दररोज लक्ष ठेवले जाते. तिथल्या खंदकात त्याला राहण्याचा सराव करवून घेतला जातो. तो तिथं छान रमू लागला की, मग नागरिकांना बघण्यासाठी त्याचे खंदक खुले केले जाते.
''सध्या प्राणिसंग्रहालयात चार नव्या खंदकांचे काम सुरू आहे. चौशिंगा, तरस, झेब्रा, आशियाई सिंह. जिराफला देखील आणायचे आहे. पण त्याला किमान दोन वर्षे लागतील. युरोपमधील एका देशातून त्याला आणावे लागणार आहे. सध्या पाच झेब्रा आपण आणणार आहोत. त्यांच्या अधिवासासारखे वातावरण खंदकात तयार केले जात आहे. - राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, कात्रज''