Pune Congress: 'माघार घ्या अन्यथा कठोर कारवाई', पुण्यातील काँग्रेसच्या बंडखोरांना २४ तासांचा अल्टीमेटम
By राजू इनामदार | Updated: November 5, 2024 18:57 IST2024-11-05T18:56:07+5:302024-11-05T18:57:13+5:30
बंडखोरांना आघाडीतील अन्य कोणताही पक्ष प्रवेश देणार नाही किंवा महापालिकेच्या येत्या निवडणुकीत उमेदवारी देणार नाही

Pune Congress: 'माघार घ्या अन्यथा कठोर कारवाई', पुण्यातील काँग्रेसच्या बंडखोरांना २४ तासांचा अल्टीमेटम
पुणे: काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पक्षाच्या बंडखोर उमेदवारांना २४ तासांची मुदत देणारी नोटीस बजावली. अजूनही वेळ गेलेली नाही, या २४ तासांमध्ये माघारीचा निर्णय घ्या, अन्यथा कठोर कारवाईस तयार रहा असा इशारा यात देण्यात आला आहे. शिस्तभंगाच्या कारवाईची ही प्रोसिजर असून आघाडी म्हणूनही या बंडखोरांवर कारवाई होईल असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रभारी शहराध्यक्ष अंकूश काकडे, शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे तसेच माजी नगरसेवक अजित दरेकर, नितिन परतानी, मुख्तार शेख, भारत जोडो आंदोलनाचे इब्राहीम खान यावेळी उपस्थित होते. पर्वती विधानसभा मतदार संघातून आबा बागुल, कसब्यातून कमल व्यवहारे आणि शिवाजीनगर मधून मनीष आनंद यांनी बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला आहे. या बंडखोरांना आघाडीतील अन्य कोणताही पक्ष प्रवेश देणार नाही किंवा महापालिकेच्या येत्या निवडणुकीत उमेदवारी देणार नाही असे सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बंडखोर उमेदवारांबरोबर पक्षाचे जे पदाधिकारी, कार्यकर्ते असतील त्यांच्यावरही पक्षाच्या वतीने अशीच कारवाई केली जाईल असे यावेळी सांगण्यात आले. शिवाजीनगरमधील पक्षाचे बंडखोर उमेदवार मनिष आनंद यांच्या पत्नी पूजा मनिष आनंद काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवण्यात आला आहे, पती मनिष आनंद यांच्याबरोबर प्रचार करणार असाल तर पदाचा, पक्षाचा राजीनामा द्यावा अन्यथा बडतर्फ केले जाईल असे त्यांना कळवण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
आघाडीचा एकत्रित निवडणूक जाहीरनामा मुंबईत जाहीर करण्यात येणार आहे. पुणे शहरातील प्रचारासाठी राज्य तसेच केंद्र स्तरावरील नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या सभांचे नियोजन होत आहे, त्याशिवाय स्थानिक प्रचारालाही सुरूवात झाली आहे. प्रचारफेरी, पदयात्रा यातून मतदारांबरोबर संपर्क साधण्यात येत आहे. शहरात आघाडी एकत्रितपणे व मजबूतीने निवडणुकीला सामोरी जात आहे, महायुतीचे भ्रष्ट राज्यसरकार घालवणे हे आमचे उद्दीष्ट आहे, ते राजकीय नाही तर राज्याच्या हितासाठीचे आहे असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.