पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत चिखली येथील २८ वर्षीय रिक्षाचालकाला मेंदुला मार लागल्याने पिंपरीतील डाॅ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दि. २० ऑगस्ट राेजी उपचारासाठी दाखल केले हाेते. मात्र, ब्रेनडेड झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी अवयवदानास परवानगी दिल्याने दाेन किडणी, फुप्फुस, ह्रदय, यकृत असे पाच अवयवांचे बुधवारी (दि. २४) सकाळी दान करण्यात आले. त्यामुळे पाच जणांना जीवनदान मिळाले आहे.
या तरूणाचे ह्रदय गुजरातमधील सूरतच्या बीडी मेदांता महावीर हार्ट इन्स्टिटयूट येथील ३५ वर्षीय तरूणावर प्रत्याराेपित करण्यासाठी पाठवण्यात आले. तर त्याचे फुप्फुस हैद्राबाद येथील कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस या हाॅस्पिटलला ६० वर्षीय रुग्णावर प्रत्याराेपित करण्यासाठी पाठवण्यात आले. हे दाेन्ही अवयव रिजनल ऑर्गन ट्रान्स्प्लांट ऑर्गनायजेशन (राेटटाे) व स्टेट ऑर्गन ॲंड टिश्यू ट्रांसप्लांट ऑर्गनायझेशन (साेटटाे) द्वारे पाठवण्यात आले. हे दाेन्ही अवयव चार्टर्ड फलाईट व व्यावसायिक विमानाने पाठवण्यात आले.
दरम्यान, त्याची एक किडनी ही ग्रीन काॅरिडाॅरद्वारे आणून ससून रुग्णालयात एका तरूणीवर प्रत्याराेपित करण्यात आली. अवयव प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया बुधवारी सकाळपासून सायंकाळी साडेचार ते पाच वाजेपर्यंत चालली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून महिलेची प्रकृती व्यवस्थित आहे, अशी माहिती किडणी प्रत्याराेपण करणारे डॉ. सुरेश पाटणकर यांनी दिली. ससूनचे अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवयव प्रत्यारोपन विभागाचे प्रमुख व ट्रान्सप्लान्ट सर्जन डॉ. सुरेश पाटणकर व पथकाने ही शस्त्रक्रिया केली.
अवयवदात्या तरूणाची दुसरी किडनी ही डाॅ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील ३८ वर्षीय तरूणावर प्रत्याराेपित करण्यात आली. तर, त्याचे यकृत देखील तेथील ६० वर्षीय महिलेवर प्रत्याराेपित करण्यात आले आहे. डाॅ. डी. वाय. पाटील रुग्णालयाने दिलेल्या माहीतीनुसार अवयवदात्या तरूणाच्या डाेक्याला मार लागल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी २० ऑगस्ट राेजी दाखल करण्यात आले हाेते. दरम्यान त्याला दुस-या दिवशी ब्रेन डेड घाेषित करण्यात आलीे. तर, पाेलीस प्रक्रिया पार पाडून त्याचे अवयवादन बुधवारी सकाळी पार पडले. यावर्षी पुणे विभागात २८ अवयवदान झाले आहेत. अवयवदानातून तर ७९ प्रत्याराेपण शस्त्रक्रिया पार पडल्याची माहीती पुणे विभागीय अवयव प्रत्याराेपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गाेखले यांनी दिली.