पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे शहरात मंगळवारी आगमन होणार आहे. त्यांच्या या दौर्यानिमित्त शहरातील महत्वाचे रस्ते सकाळी ६ ते दुपारी ३ दरम्यान बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मिडियावर फिरत आहेत. प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी यांच्या आगमनाच्या वेळी ते ज्या रस्त्यावरुन जाणार ते रस्ते त्या वेळे पुरते काही वेळ बंद राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कृषि महाविद्यालय येथे हेलिकॉप्टरने येणार. तेथून ते शिवाजी रोडने श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंदिरात दर्शन घेतील. तेथून स. प. महाविद्यालयातील टिळक सन्मान पुरस्काराला जातील. तेथून शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावरील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तेथून ते पुन्हा कृषि महाविद्यालयाच्या मैदानावरुन हेलिकॉप्टरने विमानतळावर जाणार आहेत.
याबाबत पोलिस उपायुक्त विजय मगर यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी व अन्य मान्यवर ज्या रोडने जाणार. त्या रोडवरील वाहतूक त्यांच्या येण्याच्या व जाण्याच्या वेळी काही वेळ बंद ठेवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. कोणताही रस्ता पूर्णवेळ बंद ठेवला जाणार नाही. त्यामुळे सकाळपासून दुपारपर्यंत रस्ते बंद राहणार नसल्याचे मगर यांनी सांगितले.