पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) एका वाहन निरीक्षकांच्या लॉगिन आयडी आणि सांकेतिक शब्द मिळवून त्याआधारे नऊ वाहनांना बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आरटीओ निरीक्षकांच्या तपासणीत ही बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोटारवाहन निरीक्षक रेणुका राधाकिसन राठोड (४५) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, एका आयपी ॲड्रेस धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडली होती. आरटीओकडून दररोज शेकडो वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. त्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली आहे. वाहन निरीक्षकांना सिटीझन पोर्टलच्या माध्यमातून ते प्रमाणपत्र द्यावे लागते. हे पोर्टल सुरू करण्यासाठी दररोज सकाळी संबंधित वाहन निरीक्षकांना लॉगिन करावे लागते. त्यानंतर दिवसभर कामकाज सुरू राहते. दरम्यान, संगणकीय प्रणालीत प्रवेश (लॉगिन) केल्यानंतर सांकेतिक शब्द (पासवर्ड) संबंधितांचा मोबाइल क्रमांकावरच येतो. सांकेतिक शब्द टाकल्यानंतर सिटीझन पोर्टल कार्यान्वित होते.राठोड यांचा लॉगिन आयडी आणि सांकेतिक शब्द याद्वारे आरोपीने सिटीझन पोर्टल कार्यान्वित केले. त्याद्वारे परस्पर नऊ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दिले. वाहन निरीक्षकांकडून याबाबतची नोंद ठेवण्यात येते. त्याची पडताळणी नियमित केली जाते. रेणुका राठोड यांच्या पडताळणीदरम्यान त्यांना हा लक्षात हा प्रकार आला. त्यानंकर लगेचच त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी याबाबत आरटीओतील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. तेव्हा वाहन निरीक्षकांसाठी स्वतंत्र कक्ष नाही. आरटीओ कार्यालयातील एका कक्षात कामकाज चालते. हे कामकाज सुरू असताना संबंधित वाहन निरीक्षक महिलेचा लाॅगिन आयडी आणि सांकेतिक शब्द मिळवून फसवणूक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते करत आहेत.