पुणे - आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन २००३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्याच्या घरी पोलिसांना स्फोटक साहित्य सापडले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राजाराम किसन अभंग (वय ६०, रा.अभंगवस्ती, पिंपळवडी, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. राजाराम याच्याकडे ४ पाईप बॉम्ब बनविण्यासाठी तयार केलेले स्ट्रक्चर पाईप, २ इलेक्ट्रिक गन मशीन, गन पावडर, एका तेलकट कागदामध्ये गुंडाळलेले पावडर स्वरुपातील एक्सप्लोझिव्ह (हे स्फोटक असल्याचा सिग्नल श्वानाने दिला आहे़ मात्र, ते कोणत्या प्रकारचे एक्सप्लोझिव्ह आहे, याची माहिती तपासणीनंतर सांगता येईल), २ तलवारी, २ भाले, ५९ डेटोनेटर (त्यात ४ इलेक्ट्रिक, ५५ नॉन इलेक्ट्रिक), इलेक्ट्रिक स्वीच, इलेक्ट्रिक मोटार, बॅटरी, चिलखत, हेल्मेट असे साहित्य सापडले आहे.
राजाराम याने याआधी पत्नीच्या अनैतिक संबंधातून बॉम्बस्फोट घडवून आणला होता. आता पुन्हा बॉम्बचे साहित्य कशासाठी बाळगून होता. बॉम्ब बनवून त्याचे काय करणार होता. तसेच त्याने अशा प्रकारे बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण कोठे घेतले याची माहिती तो देत नाही. ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांना अभंग याच्याकडे स्फोटक साहित्य असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरावर छापा घातल्यावर त्याच्याकडे बॉम्ब बनविण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणावर आढळून आले.
राजाराम अभंग याच्या पत्नीचे एकाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यावरुन त्याला मारण्यासाठी त्याने २००३ मध्ये बॉम्ब बनविला होता. तो त्याने त्याच्या मोटारसायकलला लावला होता. त्याचा स्फोट होऊन त्यात बाळासाहेब अभंग याची पत्नी तसेच गावातील लहान मुले जखमी झाले होते. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये राजाराम अभंग तीन वर्षे येरवडा कारागृहात होता. अभंग याला दोन मुले असून पत्नी त्याच्याजवळ राहत नाही. तसेच दोन्ही मुलेही त्याच्या जवळ राहत नाही. एका मुलगा शेती करत असून दुसरा मुलगा मुंबईत खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्याचे सातवीपर्यंत शिक्षण झाले असून त्याने एक्सप्लोझिव्ह बनविण्याचे प्रशिक्षण कोठे घेतले, नक्की कोणत्या कारणासाठी तो स्फोटक पदार्थ जवळ बाळगून होत. याचा तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुजावर हे करीत आहेत. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला बक्षीस जाहीर केले आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, रवींद्र मांजरे, जीवन माने, हवालदार शरद बांबळे, हवालदार शंकर जम, सुनिल जावळे, साबळे, भगत, अभय जावळे यांनी केली आहे.