पुणे : गावातील गुंडांची तक्रार करण्यासाठी एका तरुणीने तालुक्याच्या पोलिस ठाण्याला फोन केला; तर तो लागला एका कंपनीच्या कार्यालयात. ‘आमचा नंबर आहे हा, पोलिसांचा नाही’ असे म्हणत त्या कार्यालयातून त्या तरुणीलाच झापले गेले. तोपर्यंत तक्रार करण्यासाठी जमा केलेली तिची हिंमत ढासळली होती.
जिल्ह्यातील फक्त एका तालुक्याचे हे उदाहरण नाही, तर अनेकांना याच प्रकारच्या समस्येला सामाेरे जावे लागत आहे. सेवा आणि संरक्षणासाठी-पुणे ग्रामीण पोलिस असे बोधवाक्य असलेल्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या संकेतस्थळावर बहुसंख्य पोलिस ठाण्यांच्या माहितीची हीच स्थिती आहे. दूरध्वनी क्रमाकांपासून त्यावर सगळी जुनी, बाद झालेलीच माहिती दिलेली आहे.
या संकेतस्थळावर जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याचा कार्यालयीन क्रमांक, पोलिस अधिकाऱ्याचे नाव, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे. मात्र, ही सगळी माहिती जुनी आहे. वर उल्लेख केलेल्या तालुक्यातील तरुणीचा अनुभव समजल्यानंतर प्रतिनिधीनेच या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याला आलेला अनुभव निराशाजनकच होता.
फायनान्स कंपनीत फोन
बारामती शहर पोलिस ठाण्याचा क्रमांक एका फायनान्स कंपनीत लागला. याबद्दल त्या कंपनीला विचारले असता, गेल्या कित्येक दिवसांपासून लोक आम्हाला फोन करीत आहेत, असं सांगण्यात आले. बारामती शहर पोलिसांनी दिलेला दूरध्वनी क्रमांक '०२११२२४४३३३' हा चुकीचा आहे. बारामती ग्रामीण (तालुका) पोलिस कार्यालयातील दूरध्वनीवर तीन ते चारवेळा संपर्क साधला असता तिथूनही काही प्रतिसाद आला नाही. नंतर संकेतस्थळावर दिलेल्या पोलिस निरीक्षकांच्या क्रमांकावर फोन केला असता त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.
दोन महिन्यांपूर्वीच बदली तरीही अपडेट नाही :
दौंड पोलिस ठाण्याच्या रकान्यात क्रमांक असलेल्या पोलिस निरीक्षकांचा फोन लागला; मात्र त्यांनी १५ दिवसांपूर्वीच बदली झाल्याचे सांगितले. वालचंदनगर ठाण्याच्या कार्यालयीन क्रमांकावर तीन वेळा फोन केला. तो उचलला गेला नाही. संकेतस्थळावर तिथल्याच सहायक पोलिस निरीक्षकांचा क्रमांक होता. तो लागला; मात्र त्यांनीही दोन महिन्यांपूर्वीच तिथून बदली झाली असल्याचे सांगितले.
रस्त्याचे काम सुरू म्हणून फोन बंद
यवत पोलिस ठाण्याला तीनदा फोन करूनही उचलला गेला नाही. तिथल्या पोलिस निरीक्षकांना दोनदा फोन करूनही कोणताही प्रतिसाद नाही. वडगाव मावळच्या पोलिस ठाण्याचा कार्यालयीन नंबर बंद लागला. पोलिस निरीक्षकांचादेखील फोन लागला नाही. वडगाव निंबाळकर स्टेशनचा फोन बंद होता. रस्त्यांचे काम सुरू असल्याने केबल काढण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. पौड पोलिस ठाण्याचा संकेतस्थळावर असलेला क्रमांक अस्तित्वातच नाही. स्थानिक पोलिस निरीक्षकांचा क्रमांक आऊट ऑफ सर्व्हिस होता.
सकारात्मक प्रतिसाद मिळालेली पोलिस ठाणी :
इंदापूर, लोणावळा शहर, सासवड, शिरूर, वेल्हा, राजगड पोलिस ठाण्यामधील दूरध्वनी व्यवस्थित सुरू आहेत. तसेच संकेतस्थळावर दिलेल्या अधिकाऱ्यांचे क्रमांकही सुरू असल्याचे निदर्शनास आले. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यामधील सहायक पोलिस निरीक्षकांकडून फोनला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या कार्यालयीन दूरध्वनीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला; पण पोलिस निरीक्षकांना दोनदा फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही.