नसरापूर : सकल मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी नसरापूर (ता. भोर) येथील चेलाडी फाट्यावर हजारो मराठा बांधवांनी पुणे-सातारा महामार्ग सुमारे १५ मिनिटे रोखला. त्या वेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूस सुमारे एक किलोमीटरवर पोलिसांनी वाहतूक थांबवली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूस दोन दोन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.पुणे-सातारा महामार्ग रोखण्यासाठी सर्वजण महामार्गालगत असणाऱ्या विद्यालयाच्या मैदानावर हजारोंच्या संख्येने आंदोलक एकत्र जमले होते. या वेळी भोरच्या तहसीलदार वर्षा शिंगण, मंडलाधिकारी राजकुमार लांडगे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, भोर पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो. नि. गावडे, पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहा. पो. निरीक्षक बी. डी. शिंदे, समीर कदम, जालिंदर बरकडे उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून एसआरपीसह मोठा फौजफाटा उपस्थित ठेवला होता. अतिशय शांततेत कोणतेही गालबोट न लागता रास्ता रोको करण्यात आला.
पुणे-सातारा महामार्ग रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 1:10 AM