पुणे: चांदोमामाच्या गोष्टी आजीकडून ऐकलेल्या, त्याच चांदोबाकडे आपलं ‘चांद्रयान ३’ जात आहे, हे पाहताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर एक उत्साह, उत्सुकता, कुतुहल आणि अभिमान झळकत होता. जेव्हा ‘चांद्रयान ३’ चंद्राकडे झेपावले आणि ते सुरक्षितपणे पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले, तेव्हा विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. ‘मून चले हम’चा नारा देत भारत माता की जय बोलत हाती तिरंगा घेऊन विद्यार्थी नाचत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. हे दृश्य होते टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमधील.
भारताने आंध्रप्रदेश येथील श्रीहरीकोटा येथून शुक्रवारी दुपारी २.३५ वाजता ‘चांद्रयान ३’ चे प्रेक्षपण केले. त्याचे लाइव्ह दर्शन न्यू इंग्लिश स्कूलमधील ११०० विद्यार्थ्यांनी पाहिले. त्यासाठी खास ठिकठिकाणी स्क्रीन लावले होते. शाळेमध्ये देशाला अभिमानास्पद वाटेल अशा घटनेचे साक्षीदार हे विद्यार्थी झाले. या वेळी न्यू इंग्लिश स्कूलमधील विज्ञान मंडळाचेही उद्घाटन झाले. याप्रसंगी शालाप्रमुख दर्शना कोरके उपस्थित होत्या. स्क्रीनवर लाइव्ह दिसत असताना शिक्षक विनायक रामदासी यांनी विद्यार्थ्यांना मराठीत सर्व माहिती दिली. त्यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. ‘चांद्रयान ३’ मधील सुधारणा, चांद्रयानाची माहिती, मोहिमेचे महत्व याविषयीची माहिती प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना दिली. त्याचप्रमाणे इस्त्रोच्या वेबसाईटवरून ‘चांद्रयान ३’ च्या उड्डाणाचे प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आले.
‘चांद्रयान ३’चे वजन १७०० किलो ग्रॅम आहे. या मोहिमेसाठी ६१५ कोटी रूपये खर्च आला. या यानातील सर्व पार्ट भारतीय बनावटीचे आहेत. दुपारी चांद्रयान ३ने प्रेक्षपण झाल्यानंतर त्याला अगोदर एक सेकंदात ७ किमी झेप घेतली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने यानाचा वेग वाढत गेला. एका सेकंदात १० किमीचा वेग मिळाला. आता हे यान पंधरा दिवस पृथ्वीच्या भोवती फिरत राहणार आहे. त्यानंतर ते चंद्राकडे झेप घेईल. तिथे चंद्राच्या कक्षेत पंधरा दिवस फिरत राहून मग ते चंद्रावर सॉफ्ट लॅन्डिंग करेल. - विनायक रामदासी, शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल
हे यान फेल जाणार नाही !
चांद्रयान २ हे थेट चंद्रावर गेले आणि त्याचे सेन्सर उलटे झाले होते. त्यामुळे ते सॉफ्ट लॅन्डिंग करू शकले नाही. पण या वेळी यानाला सर्व बाजूने सेन्सर लावले आहेत. ते कसेही गेले तरी पडणार नाही.
''आज चांद्रयान ३ हे प्रत्यक्ष पहायला मिळाले, खूप मजा आली. खूप आनंद झाला. आता भविष्यात आम्ही देखील चंद्रावर जाऊ शकतो. चांदोमामाची गोष्ट आम्ही खूप ऐकली आहे. पण त्याच चांदोमामाकडे आम्हाला पण जायचे आहे. मोठे झाल्यावर आम्ही तिथे जाऊ शकू, अशा भावना सातवीमधील वेदांती सरगडे, प्रांजली बगाडे यांनी व्यक्त केल्या.''