पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिंदे गटातील नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची बाब उघड झाली आहे. निलेश माझिरे यांनी काही महिन्यांपूर्वीच मनसेतून बाहेर पडल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या माथाडी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील नेते निलेश माझिरे यांच्या पत्नी सुुप्रिया निलेश माझिरे यांनी गुरुवारी सकाळी विषप्राशन केले होते. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले. दरम्यान, निलेश माझिरे यांच्या पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली, असावी अशी प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुप्रिया माझिरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.
मनसेत असताना निलेश माझिरे हे मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र पक्षातील अंतर्गत कुरबुरींमुळे नाराज झाल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. तर निलेश माझिरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा मनसेकडून करण्यात आली होती. त्यानंतर माझिरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. तसेच शिंदे गटाने त्यांच्याकडे पक्षाच्या माथाडी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती.