लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : शहरात कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या शुभदा केदारे (वय २८) हिच्यावर कोयत्याने हल्ला करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. त्यानंतर गुरुवारी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ४० ते ५० लोक उभे असतानाही आरोपी तरुणीवर हल्ला करताेय आणि बाकी लाेक बघ्याची भूमिका घेतात. तिच्या मदतीला काेणी गेले नसल्याचे या व्हिडीओतून समोर आले आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
आराेपी कृष्णा सत्यनारायण कनोजिया (वय ३०, रा. खैरेवाडी, कात्रज, पुणे) आणि मृत शुभदा २०२२ पासून डब्लू.एन.एस. कंपनीत एकत्र काम करत हाेते. तेव्हा त्यांचा एकमेकांशी परिचय झाला. पुढे मैत्री झाली. कृष्णाच्या म्हणण्यानुसार, शुभदा हिने वडील आजारी असल्याचे सांगून उपचारांसाठी त्याच्याकडून वेळोवेळी चार लाख रुपये घेतले. मात्र, दिवसेंदिवस तिची पैशांची मागणी वाढत चालली होती. त्यामुळे कृष्णाला संशय आला. त्याने अडीच-तीन महिन्यांपूर्वी शुभदा हिचे कराड (जि. सातारा) येथील घर गाठले. तिथे त्याने वडिलांकडे विचारणा केली. त्यावेळी शुभदा हिने आपल्याकडून घेतलेले पैसे वडिलांच्या वैद्यकीय उपचारासाठी वापरले नसल्याचे पुढे आले.
कृष्णाचीही परिस्थिती जेमतेमच आहे. आपण कष्टाने कमावलेले पैसे तिने खोटे बोलून आपल्याकडून घेतले, हे त्याच्या डोक्यात बसले होते. त्यातूनच कृष्णाने कोयत्याने वार करीत तिचा खून केला.
आरोपी वार करत होता...
आरोपी कृष्णा कनोजा याने स्वतःसोबत आणलेल्या कोयत्याने शुभदाच्या हातावर वार केले. यावेळी मोठ्या संख्येने तिच्या कार्यालयातील सहकारी, ड्रायव्हर उपस्थित होते. यावेळी कोयता हातात घेऊन कृष्णा शांत डोक्याने तिच्या जवळपास वावरत होता. त्याचवेळी जर बघ्यांनी एकत्रित मिळून आरोपीवर चाल केली असती, तर शुभदा आज जिवंत असती.