पुणे - सिंहगड रोड पोलिसांनी बेकायदा शस्त्रास्त्रं जप्त केली असून आरोपीला सापळा रचून गजाआड केले. आरोपीकडून एक बेकायदा पिस्तुल, गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. धोंडीबा विठ्ठल ढेबे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सिंहगड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी गस्तीवर असताना खब-याने कर्मचारी दयानंद तेलंगे आणि दत्ता सोनवणे यांना आरोपीबाबत माहिती दिली. आरोपी ढेबे हा मुंबई-बंगळुरू महामार्गावरील प्रयेजा सिटी सोसायटीसमोर शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच त्याठिकाणी सापळा रचण्यात आला.
त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे 7.65 एमएम बनावटीचे एक देशी पिस्तुल, एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे मिळून आली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मूळचा वेल्हा तालुक्यातील रहिवासी असून मुंबईतील दादर येथे हमालीचे काम करतो. त्याने ही शस्त्रे कुठून आणली याबाबत तपास सुरु आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गिरीष सोनवणे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विष्णू जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गिरीष सोनवणे, कर्मचारी यशवंत ओंबासे, संतोष सावंत, दयानंद तेलंगे-पाटील, दत्ता सोनवणे, पुरुषोत्तम गुन्ला, सचिन माळवे, सुदाम वावरे, श्रीकांत दगडे, राहुल शेडगे, दाहुल शिंदे, वामन जाधव यांच्या पथकाने केली.