पुणे : स्मार्ट सिटीचे घसरलेले मानांकन सुधारण्यास सुरुवात झाली असून पुणेस्मार्ट सिटी राज्यात प्रथम तर देशात तेराव्या स्थानी पोचली आहे. गेल्याच आठवड्यात सुमार कामांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाभाडे काढलेल्या स्मार्ट सिटीला या मानांकनामुळे दिलासा मिळाला आहे.
स्मार्ट सिटीचे मानांकन घसरल्यामुळे टीका सुरू झाली होती. स्मार्ट सिटीकडून प्रकल्पांची माहिती वेळेत भरली जात नसल्याने हे मानांकन घसरले होते. त्यानंतर स्मार्ट सिटीकडून ही माहिती भरण्यास सुरुवात करण्यात आल्यावर हे मानांकन सुधारून १५ वर आले होते. त्यामध्ये आता सुधारणा झाली असून राष्ट्रीय मानांकनात पुणे तेराव्या स्थानी पोचले आहे. लॉकडाऊनपूर्वी पुणे सतराव्या क्रमांकावर होते. मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टम्स (एमआयएस) प्रणालीमध्ये पुणे स्मार्ट सिटीकडून अद्ययावत माहिती भरली जाते आहे. संस्था किंवा कंपन्यांना कर्मचारी, उपकरणे आणि व्यवसाय प्रक्रियेत समन्वय ठेवण्यास व क्रमवारीत एमआयएस प्रणाली साह्य करते. ------- स्मार्ट सिटीने प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा वेग वाढवला असून चांगल्या प्रकल्पांमुळे स्मार्ट सिटी मिशनमधील शहराचे स्थान आणखी उंचावेल. नियोजित प्रकल्पांसोबतच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्येही माहिती व्यवस्थापनात पुढाकार घेतला आणि कमांड अँड कंट्रोल सेंटरचा वॉर रूम म्हणून अत्यंत प्रभावीपणे उपयोग केल्याचा सकारात्मक परिणाम दिसतो आहे. - मुरलीधर मोहोळ, महापौर -------- स्मार्ट सिटीने लॉकडाऊनपूर्वी सुरू केलेली कामे सुरू ठेवली आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी स्मार्ट सिटीने आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणाली (एचएमआयएस) प्रकल्पाअंतर्गत नवे डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत. स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. - डॉ. संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी---------- महाराष्ट्रातील शहरांचे राष्ट्रीय स्तरावरील मानांकन पुणे- १३ नाशिक- १८ ठाणे- २२ नागपूर- ३१ पिंपरी चिंचवड- ४१ सोलापूर- ५० कल्याण डोंबिवली- ६५ औरंगाबाद- ६८