पुणे: रेल्वेने नोव्हेंबर महिन्यात काही स्पेशल गाड्यांचा दर्जा काढून त्या सामान्य केल्या. याच वेळी पुणेसह अन्य विभागातून पॅसेंजर गाड्या देखील सुरू केल्या. मात्र, पॅसेंजर दर्जाच्या गाड्या पूर्ण क्षमतेने धावत नाही. अद्याप काही एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना तुलनेने अधिक महागाचे तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. पुणे स्थानकावरून धावणाऱ्या जवळपास ४ पॅसेंजर व ४ एक्स्प्रेस दर्जाच्या गाड्या अजूनही बंदच आहेत. त्या कधी सुरू होणार, हा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
कोविडपूर्वी पुणे स्थानकावरून रोज साधारणपणे १२ पॅसेंजर गाड्या धावत होत्या. पैकी ७ गाड्या सुरू झाल्या असून उर्वरित ४ गाड्या सुरू झाल्या नाहीत, तर एक गाडी पुण्याहून न सुटता दौंड स्थानकांहून सुटत आहे. यासह ४ एक्स्प्रेस गाड्या देखील सुरू झालेल्या नाही. यात पुणे -सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेससारख्या महत्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. जवळपास दोन वर्षे होत आली, मात्र ह्या गाड्या अजूनही सुरू झालेल्या नाहीत.
सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस :
सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन ,डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, पुणे -सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे -बिलासपूर, पुणे - हावडा आझादहिंद एक्स्प्रेस, पुणे -नागपूर,पुणे -दानापूर एक्स्प्रेस, पुणे - अमरावती एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस आदी.
या पॅसेंजर गाड्या धावतात :
सकाळी धावणारी पुणे -सोलापर पॅसेंजर, दौंड -निजामाबाद , पुणे -सातारा -कोल्हापूर, यासह पुणे - दौंड डेमू गाड्या धावत आहे.
जनरल तिकीट बंदच :
रेल्वे प्रशासनाने केवळ लोकल व डेमू साठी जनरल तिकीट देणे सुरू केले आहे. मात्र अजूनही लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये जनरल डब्यातून प्रवास करण्यासाठी लागणारे जनरल तिकीट अद्याप बंदच आहे. जनरल तिकीट बंद असल्याने प्रवाशांना आरक्षित तिकीट काढूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना रेल्वेचा प्रवास अजूनही महागात पडतो.
पॅसेंजर गाड्यासंदर्भात राज्य सरकारशी संपर्कात आहोत. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर सेवा सुरू करण्यापूर्वी आढावा घेतला जाईल. त्यानंतर कोणत्या गाड्या सुरू करायच्या, ह्या बाबत निर्णय होईल.
मनोज झंवर,जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग ,पुणे.
रेल्वे प्रशासनाने कोविडपूर्वी ज्या गाड्या नियमितपणे धावत होत्या, त्याची सेवा आता पूर्ववत करणे गरजेचे आहे. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी जनरल तिकीट व पॅसेंजर गाड्या तत्काळ सुरू केल्या पाहिजे.
निखिल काची , विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य,पुणे.