रेडणी (पुणे) : नीरा व कऱ्हा नदीच्या खोऱ्यात सोमवार व मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे नीरा नदीला पूर आला आहे. सकाळपासून नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत होती. दुपारी वालचंदनगर - नातेपुते रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला. पोलीस यंत्रणेने खबरदारी म्हणून फलक लावला होता. पुरामुळे नदीकाठच्या शेतातून पाणी वाहत होते, तर नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. वालचंदनगर परिसरातही मंगळवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते.
दरम्यान, सध्या परीक्षांचा हंगाम सुरू असून, वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालयात नदीपलीकडील ओंकार हाके हा बारावीचा विद्यार्थी परीक्षा देऊन दुचाकीवरून घरी चालला असता पुराच्या पाण्यामुळे तो वाहत गेला, परंतु सुदैवाने नदीकाठच्या झुडपात तो अडकला. तेथील काही धाडसी युवकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्धमान विद्यालयाच्या निष्काळजीपणाबाबत नाराजी व्यक्त केली.
एकीकडे वालचंदनगरमधीलच भारत चिल्ड्रन्स अकॅडमीच्या प्राचार्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सकाळी सहा वाजल्यापासूनच सर्व विद्यार्थ्यांना फोन करून परीक्षा पुढे ढकलली असल्याचे सांगितले, तर दुसरीकडे वर्धमान विद्यालयाच्या निष्काळजीपणाची चर्चा परिसरात दिवसभर होती.