उरुळी कांचन (पुणे) :पुणे-सोलापूर महामार्ग जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. कोरेगाव मूळ हद्दीतील इनामदार वस्ती येथे मंगळवारी ( दि.९) दुपारी साडेबाराच्या सुमारास तिहेरी प्रकारचा अपघात घडून स्मिता ज्ञानेश्वर शिंदे (रा. कोरेगाव मूळ इनामदार वस्ती, वय ६१) या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.
अपघातस्थळी असलेल्या स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणगाव येथील विजू राजू थोरात (वय ४०) व नाना लबडे (वय ४५) हे दोघे उरुळी कांचन बाजूकडून हडपसरच्या दिशेने आपली दुचाकी रस्त्यात बंद पडल्यामुळे ढकलत निघाले होते. तर पुणे-सोलापूर रोड लगत आकाश रोझ नर्सरी आहे. या नर्सरीत एका टेम्पोमध्ये नर्सरीतील रोपे भरण्याचे काम कामगार करत होते. त्या कामगारांबरोबर नर्सरीच्या मालकीण याही होत्या. कार (एमएच १२ पीसी ३६९१) ही भरधाव वेगात उरुळी कांचनकडून हडपसरच्या दिशेने येत होती. कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याने दुचाकी ढकलत असलेल्या दोघांना धडक दिली.
त्यानंतर कार प्रचंड वेगात आकाश नर्सरीत शिरली. तसेच रोपे भरत असलेल्या टेम्पोला धडक दिली. तेथेच उभ्या असलेल्या स्मिता शिंदे यांनाही जोरात धडक बसली. या धडकेमुळे शिंदे यांचा एक हात तुटून एका बाजूला पडला तर त्या दुसऱ्या बाजूला पडल्या. त्यांना तात्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, उपचार करण्यापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर दोन जणांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.