पुणे: पुण्यात समाधान चौकात सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारात पेव्हिंग ब्लाॅकच्या रस्त्यावरून अचानक एक टँकर खड्ड्यात गेल्याची घटना घडली आहे. रस्ता खचल्याने हा टँकर खड्ड्यात पडल्याचे दिसून आले आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसर, लक्ष्मी रस्त्यावरील समाधान चौकात सिटी पोस्टचे कार्यालय आहे. त्याच्या आवारात वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याठिकाणी दुचाकी लावल्या जातात. तसेच पोस्टाचे ट्रक त्या आवारात थांबत असतात. आज दुपारी ४ च्या सुमारास पुणे महानगपालिकेचा टँकर तेथे येऊन थांबला होता. तो अचानकच खड्ड्यात गेला. प्रसंगावधान ओळखून ड्रायव्हरने उडी मारल्याने जीव वाचला आहे. पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचल्याने तो टँकर खड्ड्यात गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. टँकर खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
नेमकं काय घडलं?
सिटी पोस्ट कार्यालयाच्या समोर पुणे महानगरपालिकेचा टँकर उभा होता. ड्रेनिजची साफसफाई करण्यासाठी हा टँकर सिटी पोस्टच्या आवारात आला होता. त्यामध्ये चालकही बसून होता. त्याने हळूहळू टँकर पुढे घेण्यास सुरुवात केली. परंतु अचानकच तो टँकर मागे जाऊ लागला. पुढची चाकही वर येऊ लागली. प्रसंगावधान चालकाच्या लक्षात आले. आणि त्याने झटकन टँकरमधून उडी मारली. क्षणातच टँकर पेंव्हींग ब्लॉकच्या रस्त्यावरून खड्ड्यात गेला. वेळप्रसंगी चालकाला कळल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.