पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणे शहर संघाच्या खेळाडूंची निवड चाचणी येत्या १८ व १९ फेब्रुवारीला होणार आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियम (मंगळवार पेठ) येथे ही चाचणी होणार असल्याचे राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव शिवाजीराव बुचडे यांनी सांगितले.
ही निवड चाचणी गादी आणि माती या दोन्ही विभागात होणार आहे. दोन्ही विभागांत ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२ आणि ९७ किलो तसेच ‘महाराष्ट्र केसरी’ गट ८६ ते १२५ किलो वजनी गटांमध्ये ही निवड चाचणी होणार आहे. १८ फेब्रुवारीला रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२ या वेळेत खेळाडूंची वजने घेतली जाणार आहेत.
या निवड चाचणीत केवळ पुणे शहरातील खेळाडूंनाच सहभागी होता येणार आहे. त्यासठी तालीम संघाचा नोंदणीकृत खेळाडू असणे बंधनकारक असणार आहे. खेळाडूंनी आधारकार्डची मूळ प्रत व दोन फोटो सोबत आणावेत. अधिक माहितीसाठी खेळाडूंनी राष्ट्रीय तालीम संघ, मंगळवार पेठ येथे किंवा अविनाश टकले, योगेश पवार, गणेश दांगट, सागर भोंडवे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवाजीराव बुचडे यांनी केले आहे.