पुणे : उत्तरेकडील थंड वारे येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे ११.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. अन्य ठिकाणी ते सरासरीच्या जवळपास आहे.
राजस्थान, पंजाब, हरियाना, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेशात काही ठिकाणी शीत लहर आली आहे. अनेक ठिकाणी तापमान शुन्य अंशाच्या खाली गेले आहे. पुढील दोन तीन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
पुुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यप यांनी सांगितले की, पश्चिमेकडील हवामानात बदल घडत असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा येत होता. त्यामुळे राज्यातील तापमान हे सरासरीच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येत होते. येत्या ४८ तासात उत्तरेकडील वारे आपल्या राज्यात प्रवेश करत आहेत. त्यामुळे २१ डिसेंबरपासून पुणे शहरातील किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात ते ८-९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.मात्र, थंडीची लाट येण्याची शक्यता नाही. २२ डिसेंबरनंतर वाऱ्यांची दिशा बदलण्याची शक्यता असून त्यानंतर हळूहळू पुन्हा किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी विदर्भातील तापमानात २३ डिसेंबरनंतर वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे ११.५, लोहगाव १४, जळगाव ११.३, कोल्हापूर १५.७, महाबळेश्वर १२.५, नाशिक १२.५, मालेगाव १५.४, सांगली १४.३, सातारा १३.२, सोलापूर १२.४, मुंबई २१.४, सांताक्रूझ १९.८, अलिबाग १८.५, रत्नागिरी १८.५, पणजी १८.४, डहाणू १८.५, औरंगाबाद १२, परभणी १३, नांदेड १४, अकोला १४.७, अमरावती ११.८, बुलडाणा १२.२, ब्रम्हपुरी १२.८, चंद्रपूर १३.६, गोंदिया ११.५, वाशिम १४, वर्धा १२.६.