पुणे : पुणे शहरातील कमाल तापमानात आता पुन्हा वाढ होऊ लागली आहे़. शनिवारी शहरातील कमाल तापमान ३८.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़. त्यात रविवारी आणखी वाढ होऊन ते ३९.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली़ पुढील दोन दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे़. तसेच विदर्भात उष्णतेची लाट आली असून ती आणखी चार दिवस कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४५.६ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १९ अंश सेल्सियस नोंदविले गेले आहे़. देशात सध्या ओडिशा, बिहार, विदर्भ आणि तेलंगणा येथे उष्णतेची लाट आली आहे़.
पुण्याच्या किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे़. रविवारी किमान तापमान सरासरीएवढे २२़ ३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़. ते पुढील दोन - तीन दिवसात २३ ते २४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित घट झाली आहे़. पुढील चार दिवस गोव्यासह राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. विदर्भात १३ ते १६ मे दरम्यान तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. ़़़़१३ ते १६ मे दरम्यान वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असेल़ १४ ते १६ मे दरम्यान अकोला, अमरावती, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असणार आहे़.