जेजुरी : मोठा गाजावाजा करीत येत्या २३ जुलै रोजी होणारा शासनाचा शासन आपल्या दारी कार्यक्रम पुन्हा रद्द झाला आहे. कार्यक्रम तिसऱ्यांदा रद्द झाल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यातील जेजुरीत येथील पालखी मैदानावर संपूर्ण मैदानावर कोट्यावधी रुपये खर्चून कार्यक्रमाची जोरदार तयारी केली होती. सुरुवातीला ३ जुलै, नंतर १३ जुलै आणि उद्या २३ जुलै रोजी कार्यक्रम घेण्यात येणार होते. आता उद्याचा कार्यक्रम रद्द झाल्याने तिसऱ्यांदा या कार्यक्रमाला मुहूर्त लाभला नाही. कार्यक्रम रद्द का झाला याचे कारण मात्र समजू शकले नाही.
पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी शासनाने संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन गेले महिनाभर कामाला लावले होते. सर्वच विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांपासून अगदी शिपायापर्यंत शासकीय कर्मचारी आपली दैनंदिन कामकाज सोडून या कार्यक्रमाच्या तयारीला लागले होते. जेजुरीच्या शासन आपल्या दारी याच कार्यक्रमात जेजुरी देव संस्थान विकास आराखड्याच्या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार होते. ते ही महिनाभरापासून रखडल्याने नाराजीचा सूर निघत आहे.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून राज्याचे प्रमुख वीस ते २५ हजार लोकांसमोर आपले राजकीय वर्चस्व निर्माण करू पाहत आहेत. पण त्यालाही मुहूर्त मिळत नाही ही शोकांतिका आहे. राजकारण्यांच्या हट्टापायी शासकीय अधिकारी कामाला जुंपले असले तरी हा कार्यक्रम कितपत यशस्वी होईल याही शंकाच होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शासकीय पातळीवरून मोठे प्रयत्न होत होते. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील तालुका प्रशासन कामाला लागले होते. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात गाव भेट दौरे काढले होते. पण ते दौरे लाभार्थ्याविना होत होते. पुरंदर तालुक्यातीलच माहिती घेतली तर हे दौरे लाभार्थ्यांविनाच गाव भेट दौरे झाल्याचे निदर्शनास येत आहे.
शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यात १८ जुलै पासून गाव भेट दौऱ्याच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी सक्षम अधिकाऱ्यांसह बहुतांश अधिकाऱ्यांनी या उपक्रमास दांडी मारली तर नागरिकांनीही माहिती अभावी याकडे पाठ फिरवल्याचे पाहवयास मिळाले. पुरंदर तालुक्यामध्ये शासन आपल्या दारी हा उपक्रम होणार असून अनेक वेळा या कार्यक्रमाचे नियोजन होऊन ऐनवेळी रद्द झाला होता. पुन्हा २३ तारखेला हा कार्यक्रम होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यामध्ये गावोगावी गाव भेट दौऱ्याचे नियोजन केले होते. यासाठी तालुकास्तरीय सक्षम अधिकाऱ्यांच्या नियोजनाखाली गावातील सर्व खात्यांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत गाव भेट दौरे आयोजित केले होते. मात्र या दौऱ्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना ऐनवेळी नियोजन समजले तर काहींना आपण उपस्थित राहण्याचे समजले पण यावेळी काय करायचे हेच समजले नाही.