पुणे - मेट्रोच्या फलाटावर तो आईबरोबर होता, खेळताखेळता अचानक तो फलाटावरून खाली गेला. आई घाबरली व त्याला वर आणण्यासाठी तीही खाली उतरली. त्याचवेळी रूळांच्या दोन्ही बाजूंनी दोन मेट्रो येत होत्या. फलाटावर उभे असलेल्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र तिथेच उभ्या असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने गडबडून न जाता फलाटावर असलेले आणीबाणीच्या क्षणी दाबायचे बटण दाबले व दोन्ही मेट्रो जिथे होत्या तिथेच थांबल्या.
पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकातील उन्नत मेट्रोच्या फलाटावर दुपारी २ वाजून २२ मिनिटांनी हा प्रकार घडला. भीषण दुर्घटना सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधनामुळे टळली. विकास बांगर हे त्या सुरक्षा रक्षकाचे नाव. त्यांनी प्रसंगावधान दाखवले नसते तर शुक्रवारी ही दुर्घटना घडलीच असती. मेट्रोला आता प्रवासी संख्या वाढली असल्याने फलाटावर बऱ्यापैकी गर्दी असते.
अशीच गर्दी शुक्रवारी दुपारीही होती. ३ वर्षांचा हा मुलगा त्याच्या पालकांसमवेत फलाटावर उभा होता. स्थानक पाहतपाहता ते फलाटाच्या कडेला आला व अचानक त्याचा पाय घसरला. तो थेट खाली पडला. त्याचा आवाज ऐकताच त्याची आई त्याच्याकडे दाखवली. मुलगा खाली पडला हे पाहताच तीपण घाबरली. मुलाला वर घ्यावे म्हणून तीपण घाईघाईत फलाटावर उतरली. मात्र तीला मुलासह वर येता येईना. वर येण्यासाठी तिची गडबड सुरू असतानाच मेट्रोचा आवाज व सायरन ऐकू यायला लागला.
फलाटावर उभे असलेल्या सगळ्यांचीच धावपळ सुरू झाली. सुरक्षा रक्षक विकास बांगर फलाटावरच उभे होते. क्षणभर तेही गडबडले, मात्र लगेच त्यांनी धाव घेतली ती अशा आणीबाणीच्या वेळी दाबायच्या प्लंजर बटणाकडे, फलाटावरच एका खांबावर हे बटण लावले असून ते दाबावे अशा सुचनाही तिथे लिहिल्या आहेत. बांगर यांनी धावतपळत हे बटण गाठले व लगेचच दाबले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी आलेल्या दोन्ही मेट्रो जागेवरच थांबल्या. मुलगा व त्याच्या आईपासून त्या केवळ ३० मीटर अंतरावर होत्या.
त्यानंतर मुलगा व आईला फलाटाच्या खालून वर घेण्यात आले. विकास बांगर यांनी सांगितले मी मुलाला पडतान पाहिले होते, त्याचवेळी सावध झालो होते. त्याचवेळी आईपण खाली पडताना दिसली. त्याचवेळी मलाही मेट्रोचा आवाज एकू आला. माझ्याकडे कमी वेळ होता. त्यामुळे धावतच मी बटण गाठले व तत्काळ ते दाबले. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या मेट्रो जागेवर थांबल्या. बांगर यांचा नंतर तिथेच प्रवासी व मेट्रोच्या स्थानक अधिकाऱ्यांनी गौरव केला व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. मेट्रोच्या नियमाप्रमाणे ही माहिती स्थानकप्रमुखांना कळवण्यात आली.
मेट्रोच्या प्रत्येक स्थानकावर व प्रत्येक गा़डीत हे बटण आहे. आपत्तीच्या क्षणी ते दाबायचे असते. त्याची माहिती तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणही मेट्रोच्या सर्व सुरक्षा रक्षक तसेच कर्मचाऱ्यांनाही देण्यात आले आहे. प्रवाशांनाही त्याची माहिती व्हावी यासाठी फलक लिहिण्यात आले आहेत. त्याचा उपयोग होतो याची प्रचिती आज आली.हेमंत सोनवणे- संचालक जनसंपक, महामेट्रो,