पुणे : घरगुती गॅस वितरित करण्याआधी गॅस सिलिंडरमधून गॅस काढून घेऊन त्याचा काळाबाजार करणा-या गॅस एजन्सीच्या दोघा कामगारांना गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सव्वातीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.सुनील भवरलाल जैन (वय २३, रा़ पिंपळे गुरव, मूळ राजस्थान), दिनेश चेन्नाराम जानी (वय १९, रा़ पिंपळे गुरव, मूळ राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम मोरे, शिवानंदन स्वामी, हवालदार रोहिदास लवांडे, गुणशिलम रंगम, महेंद्र पवार, गजानन गणबोट, संदीप राठोड, कल्पेश बनसोडे यांनी केली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या टोलनाक्याशेजारी बोपोडीतील श्रीराम गॅस एजन्सीच्या दोन कामगारांनी लाल रंगाचा टेम्पो पार्क केला आहे. ते तेथे ग्राहकांना वितरित करण्याचे गॅस सिलिंडरला पाइप लावून दुसºया गॅस सिलिंडरमध्ये भरत आहेत़ ते बेकायदा काळाबाजारात हे सिलिंडर विकत असल्याची माहिती शुक्रवारी दुपारी युनिट ३ च्या पथकातील अधिकारी व कर्मचाºयांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून दोघांना गॅस काढून घेत असताना रंगेहाथ पकडले़ त्यानंतर त्याच्याकडून एक पॅगो कंपनीचा टेम्पो, एकूण ३३ गॅस सिलिंडर, एक स्टेनलेस स्टीलचा पाइप, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, गॅस डिलिव्हरी पावत्या व रोख रक्कम असा ३ लाख २९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुणे : सिलिंडरमधून काढून घेत होते गॅस, काळाबाजार करणारे दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 6:45 AM