चाकण: पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटल्याने त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. तर तिस-या अपघातात ट्रकच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले.
पुणे-नाशिक महामार्गावर सुर्या हॉस्पिटलसमोर रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी इसमाचा मृत्यू झाला आहे. नारायण सीताराम कांबळे (वय.४५ वर्षे, रा. कडाचीवाडी, ता. खेड) असे ट्रकच्या धडकेत मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ सतीश सीताराम कांबळे (वय.५० वर्षे ) यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक गोविंद गंगाधर चाटे (वय.२७ वर्षे, रा. चाकण) याला पोलिसांनी अटक केली आहे. पादचारी नारायण कांबळे हे सोमवारी दुपारी साडेबारा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर सुर्या हॉस्पिटल समोर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव ट्रकने कांबळे यांना धडक दिली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.
दुसऱ्या घटनेत दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रोहकल वाकी रस्त्यावर तरुण ठार झाला आहे. या अपघातात आशिष मारुती मचेकर (वय.२२ वर्षे, रा. देहूगाव) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. आशिष याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात चालवून तिच्यावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात आशिषचा मृत्यू झाला. ही घटना चाकण गावच्या हद्दीत रोहकल ते वाकी रोडवर घडली असल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले.
तिस-या घटनेत प्रतीक महाबल शिरढोणे (वय.२३ वर्षे, सध्या रा. देहूगाव, मूळ रा. सोलापूर) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या वेळी प्रतीक त्याच्या दुचाकीवरून येलवाडी वरून देहूगावकडे जात होता. येलवाडी गावच्या हद्दीत रस्त्यावरील खड्ड्यात त्याची दुचाकी आदळली. यात त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्यावर पडला. यात गंभीर जखमी झाल्याने प्रतीकचा मृत्यू झाला. याबाबतचा अधिक तपास महाळुंगे पोलीस करीत आहेत.