संतोष गाजरे
कात्रज : पुणे शहरात मागील तीन दिवसापासून संततधार सुरू असून पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून अनेक भागात रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. डेक्कन परिसरात असणाऱ्या भिडे पूल परिसरातील झेड ब्रिज खाली नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे नदी पात्रात असलेल्या अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेलेल्या तिघांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यांना लागलीच हॉस्पिटल येथे दाखल केले. ही घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
डॉक्टरांनी विजेचा शॉक लागलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तसेच सीपीआर देखील तातडीने दिला. परंतु उपचारास प्रतिसाद देत नसल्याने पाच वाजता डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले.
अभिषेक अजय घाणेकर (वय २५ )राहणार पुलाची वाडी डेक्कन, आकाश विनायक माने (वय २१) राहणार पूलाची वाडी डेक्कन, शिवा जिदबहादुर परिहार ( वय १८ ) नेपाळ, अशी मृत तिघांची नावे आहेत. तसेच सध्या जोराचा पाऊस सुरू असून पाण्यामध्ये विजेचे तारा तसेच अन्य उपकरणे दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी तसेच महानगरपालिकेने केले आहे.