लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ३२ टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले असून, जिल्ह्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. शहरात ३९ टक्के लोकसंख्येचे, पुणे ग्रामीणमध्ये ३० टक्के लोकसंख्येचे तर पिंपरी चिंचवडमध्ये २२ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पुणे विभागातही सातारा आणि सोलापूरच्या तुलनेत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. लसींचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत झाला तर लसीकरण अधिक वेगाने होऊ शकणार आहे.
देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, चौथ्या टप्प्यात ४५ ते ६० वयोगट तर पाचव्या टप्प्यामध्ये १८ ते ४४ या वयोगटातल्या लसीकरण सुरू करण्यात आले. गेल्या आठवड्याभरात जिल्ह्यात लसीकरणाला चांगली गती मिळत आहे.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ७३ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला तर ६६ टक्के जणांना दुसरा डोस मिळाला आहे. अत्यावश्यक सेवेतील ८१ टक्के कर्मचाऱ्यांना पहिला, तर ४६ टक्के कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मिळाला आहे. एकूण लोकसंख्येपैकी ३३ टक्के नागरिकांना पहिला डोस, तर २७ टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे.
शहरातील लसीकरण केंद्रांवर मुबलक लसींचा पुरवठा होत नसल्याने दर रविवारी केंद्र बंद ठेवावे लागत आहे. त्यामुळे या दिवशी जर लस उपलब्ध झाली, तर लसीकरणाचा वेग वाढणार आहे.
-----
जिल्हा लसीकरण स्थिती :
भाग लोकसंख्या लसीकरण
पुणे शहर 41,29,366 16,27,690
पुणे ग्रामीण 47,73,589 14,36,381
पिंपरी चिंचवड 28,45,681 6,52,297
----------
पुणे विभागातील आकडेवारी :
जिल्हा लोकसंख्या लसीकरण
पुणे 1,17,48,636 37,16,368
सातारा 32,10,155 8,60,274
सोलापूर 48,08,537 7,04,001