पुणे : रस्त्यावर बस बंद पडल्याने सातत्याने वाहतुक विस्कळित होत असल्याने वाहतुक पोलिसांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता पीएमपी प्रशासनही जागे झाले आहे. ब्रेकडाऊन झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी थेट पथक नेमण्यात आले आहे. हे पथक ब्रेकडाऊनची तपासणी करून करून जबाबदारी निश्चित करणार आहे.
‘पीएमपी’ ताफ्यातील दररोज सुमारे १५० ते १६० बस मार्गावर बंद पडतात. या बंद बसमुळे रस्त्यांवर वाहतुक कोंडी होते. त्याचा परिणाम इतर रस्त्यांवर होतो. सकाळी किंवा सायंकाळी बस बंद पडल्यास वाहनचालकांना आणखी त्रासाला सामोरे जावे लागते. वाहतुक पोलिसांकडून बसवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, तरीही ब्रेकडाऊनची संख्या कमी होत नसल्याने वाहतुक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी नुकतीच पीएमपीतील वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेऊन ब्रेकडाऊन कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. ब्रेकडाऊन कमी करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून आधीपासूनच विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र अनेक बस जुन्या असल्याने त्याला मर्यादा येत आहेत. खासगी ठेकेदारांच्या बसचे ब्रेकडाऊनही जास्त आहे. मात्र, त्यावर पीएमपीचे नियंत्रण नाही. पोलिसांकडून थेट ठेकेदारांकडून बसचालकाकडूनच दंड वसुली केली जाते.
आता पीएमपीने आणकी एक पाऊल टाकत ब्रेकडाऊनची जबाबदारी निश्चित करण्यासाठी चार सदस्यीय पथक स्थापन केले आहे. त्यामध्ये अपघात प्रमुखांसह, चेकर व इतर कर्मचाºयांचा समावेश आहे. हे पथक वाहतुक विभागाकडून दंड लावण्यात आलेल्या बसची तपासणी करून बस बंद पडण्याची कारणे शोधणार आहे. त्याआधारे त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल. त्यानंतर हा अहवाल प्रशासनाकडे जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.