पुणे : नववर्षांच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन गाडी चालवण्याचा विचारही पुणेकरांनी करू नये इतकी कडक व्यवस्था पुणे पोलिसांनी केली आहे. त्यामुळे दारू पिऊन स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी मोहीम सुरु केली आहे. आज सकाळी ९ वाजेपासून सुरु झालेली ही मोहीम उद्या अर्थात १ जानेवारीच्या सकाळपर्यंत सुरु राहणार आहे. याबाबत पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, यंदा नववर्षाचे स्वागत करताना गुन्हे थोपवण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी संपूर्ण शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेतला जाणार आहे. या कॅमेऱ्यामध्ये सुमारे १५ दिवसांचे रेकॉर्डिंग साठवले जाणार आहे. त्यामुळे संबंधित व्हिडीओ बघून गाडीचालकांवर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय शहरात ठिकठिकाणी पोलीस पथक वाहनचालकांची तपासणी करणार आहेत. त्यासाठी यंदा अद्ययावत श्वास तपासणी यंत्र वापरले जाणार आहे. यावेळी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून गाडी ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मद्य प्राशन करून किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल असे वर्तन करू नये असे आवाहन त्यांनी केले. आगामी वर्षात ध्वनी प्रदूषण व गंभीर अपघात रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणेकरांनो, दारू पिऊन गाडी चालवण्याचा विचारही नको, पोलिसांनी अशी केलीये तयारी !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 2:40 PM