पुणे : पुण्यातील बिनतारी संदेश विभागाच्या मुख्यालयात देशातील प्रशिक्षणार्थींना एकाच वेळी प्रशिक्षण देण्यासाठी सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याचे पोलीस बिनतारी संदेश विभागाचे संचालक रितेशकुमार यांनी सांगितले, पाषाण येथील पोलीस बिनतारी संदेश विभागाच्या २०६ तांत्रिक सहायक पोलीस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल व कॉन्स्टेबल पदाच्या प्रशिक्षणार्थींचा दीक्षान्त संचलन सोहळा गुरुवारी पार पडला. त्यावेळी रितेशकुमार यांनी ही घोषणा केली. पोलीस आयुक्त डॉ. के़. वेंकटेशम हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या वेळी पोलीस उपमहानिरीक्षक राजेंद्र डहाळे, पोलीस उपअधीक्षक अनिल भोपे तसेच बिनतारी संदेश विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय पोलीस महासंचालक/पोलीस महानिरीक्षक यांची परिषद पुण्यात ६ ते ८ डिसेंबर घेण्यात आली होती. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित होते. या परिषदेत पुण्यातील बिनतारी संदेश विभागात होणाऱ्या देशभरातील प्रशिक्षणार्थींसाठी उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राची संकल्पित चित्रफीत दाखविण्यात आली होती. या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रात देशभरातील विविध राज्यांतील बिनतारी संदेश विभागातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांच्यासाठी विविध कोर्स सुरू करण्यात येणार आहेत. ई-लर्निंगच्या माध्यमातून ते प्रशिक्षणही घेऊ शकणार आहेत. त्यात प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येईल. येत्या २ वर्षांत हे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मनोदय आहे.पोलीस दलामध्ये बिनतारी दळणवळणाचे महत्त्व विशद करून डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले, की बिनतारी संदेश विभाग हा कायदा-सुव्यवस्था स्थापन करण्यामधील पडद्यामागील विभाग आहे. सायबर व तांत्रिक गुन्ह्यांमधील बिनतारी विभागाचे भविष्यातील योगदान महत्त्वाचे असेल. प्रशिक्षणार्थींच्या नवीन पाठ्यक्रमाचा समावेश केल्याबद्दल व सर जे. बी. बोस डिजिटल लॅॅब व डॉ. एपी़जे़ अब्दुल कलाम इनोव्हेशन सेंटरच्या निर्मितीबद्दल त्यांनी रितेशकुमार यांचे कौतुक केले.
देशभरातील प्रशिक्षणार्थींसाठी पुण्यात सुसज्ज प्रशिक्षण केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 12:52 PM
विविध राज्यांतील बिनतारी संदेश विभागातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
ठळक मुद्देबिनतारी संदेश विभागाचे संचालक रितेशकुमार : दीक्षान्त संचलन सोहळायेत्या २ वर्षांत हे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मनोदय सायबर व तांत्रिक गुन्ह्यांमधील बिनतारी विभागाचे भविष्यातील योगदान महत्त्वाचे