दौंड : रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी रविवारी ( दि.१७) सकाळी ९ वाजता रेल्वे कुरकुंभ मोरी येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दौंड - पुणे प्रवाशी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी दिला आहे. दौंड येथे सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या बैठकीला सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कटारिया म्हणाले; एकीकडे मुंबई- लोणावळा , लोणावळा- पुणे लोकल सुरु करण्यास हिरवा कंदील दाखविला जातो. पण दुसरीकडे सर्वसाधारण कामगार आणि जनतेच्या हितासाठी दौंड - पुणे शटल सुरु होत नाही ही गंभीर बाब आहे.
दौंड - पुणे शटल सुरु व्हावी यासाठी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. मात्र तरीदेखील रेल्वे प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्याच निषेधार्ह संघटनेच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन केले जाणार आहे.
दौंडकरांच्या नशिबी भांडल्याशिवाय काही मिळत नाही हे कायमचेच असल्याने नाईलाजास्तव जनतेच्या हितासाठी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान,जोपर्यंत रेल्वे शटल सुरु होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील असेही यावेळी कटारिया म्हणाले.