पुणे : गणेश पेठेत उघडकीस आलेल्या तिहेरी खून प्रकरणी पोलिसांनी शनिवारी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे तपास सुरु आहे. खून झालेल्यांपैकी नावेद रफिक शेख (वय १५, रा. नवा मशिदजवळ, नाडे गल्ली) आणि संदीप अवसरे (वय अंदाजे ३२ ते ३५) यांची नावे निष्पन्न झाली असून, अन्य एकाचे नाव समजू शकले नाही.नागझरी नाल्यात शुक्रवारी तीन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. कठीण वस्तूने डोक्यात प्रहार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविश्चेदन अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणी आरीफ शेख (वय २७, का. २३७, गणेश पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.तिहेरी खुनाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास पथक स्थापन केले होते. त्यादरम्यान तपास करताना एका मुलीने शेख याला छायाचित्रावरुन ओळखले. शेखच्या मामाने देखील मृतदेहाची खातरजमा केली. शेखला दोन विविहत बहिणी असून, वडील हयात नाहीत. तो, त्याच्या आईसोबत राहत होता. त्याला व्हाईटनरचे व्यसन होते. त्यामुळे अनेकदा तो दिवसेन दिवस घरी येत नसे. घटना उघड होण्यापुर्वी चार दिवस तो घरी गेला नव्हता. ओळख पटवून शेख याचा मृतदेह त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती फरासखाना गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिली.मृतांमधील एकाचे नाव संदीप अवसरे असल्याचे सांगत आहेत. मात्र, त्याच्या घरच्यांचा शोध लागू शकला नाही. त्याला ओळखणाºया व्यक्तींनी त्याचे नाव सांगितले. मात्र, त्यांना घरची माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले.मृत पावलेल्या व्यक्ती भंगार गोळा करण्याचे काम करीत होत्या. संशयित देखील भंगार गोळा करण्याचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुणे : तिहेरी खूनप्रकरणी दोघांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 5:19 AM