पुणे- शहरातील सेनापती बापट मार्गावर एका महिला प्रवाशाला उबर ड्रायव्हरच्या एका धक्कादायक प्रश्नाला सामोरं जावं लागलं आहे. तुमच्यासाठी 'नाइट पार्सल' (दारू) आणू का? असा प्रश्न सहजपणे या ड्रायव्हरने महिला प्रवाशाला विचारला. बुधवारी रात्री 8 वाजता हा संपूर्ण प्रकार घडला आहे. नाइट पार्सल म्हणजे नेमकं काय असतं? हे सुरुवातीला महिलेला समजलच नाही. नंतर त्या ड्रायव्हरने याबद्दल महिलेला सांगितलं. नाइट पार्सल म्हणजे वोडका असतो, असं त्या ड्रायव्हरने महिलेला सांगितलं. ड्रायव्हरचं हे धक्कादायक उत्तर ऐकून महिलेने तात्काळ राइड रद्द करत त्या ड्रायव्हरची तक्रार केली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
सेनापती बापर मार्गावर रस्त्याच्याकडेला महिला उबरची वाट पाहत होती. उबर यायला 10 मिनिच उशिर झाला होता. त्यामुळे महिलेने ड्रायव्हरला फोन करून उशिर होण्याचं कारण विचारलं. बालाजी असं त्या ड्रायव्हरचं नाव होतं. त्याने आधी महिलेला नीट उत्तर दिलं नाही पण नंतर त्याने दिलेल्या उत्तरामुळे महिलेला धक्का बसला. 'मला यायला पाच मिनिटं उशिर होइल. तुम्हाला 'नाइट पार्सल' हवं आहे का? असं त्याने विचारलं. नाइट पार्सल म्हणजे वोडका असून तुम्हाला आता दारु प्यायची आहे का? असा सवाल त्याने विचारला. ड्रायव्हरचं हे धक्कादायक विधान ऐकून महिलेला धक्का बसला. तिने लगेचच फोन कट केला. पण त्यानंतर त्या ड्रायव्हरने तीन वेळा महिलेला पुन्हा फोन केला. पण मी फोन उचलला नाही. अॅपमध्ये पाहिल्यावर गाडी 2-3 मिनिटाच्या अंतरावर होती. मी लगेचच राइड रद्द केली व रस्ता ओलांडून दुसरीकडे जाऊन उभी राहिली, असं या महिलेने सांगितलं.
त्यानंतर महिलेने रिक्षाने प्रवास करत घर गाठलं. एक कॅब ड्रायव्हर असं कसं विचारू शकतो. मी याबद्दल उबरमध्ये तक्रार केली आहे, अशी माहिती महिलेने दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसात तक्रार करणार नसल्याचं महिलेने म्हटलं. चतुश्रुंगी पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेने तक्रार केली तरच याप्रकरणात कारवाई करता येईल.