पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे युवा गाैरव पुरस्काराची घाेषणा करण्यात आली आहे. पुरस्कराचे हे पहिले वर्ष असून हा पुरस्कार क्रिकेटर केदार जाधव, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि युवा नाटककार धर्मकिर्ती सुमंत यांना जाहीर करण्यात आला आहे हे पुरस्कार विद्यापीठाच्या वर्धापनदिनी (१० फेब्रुवारी) वितरित केले जाणार आहेत.
मानपत्र व २५ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विद्यापीठातर्फे या वर्षापासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. कला, क्रीडा, साहित्य, संशोधन व सामाजिक या क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील कामगिरी करणाऱ्या व ४० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या माजी विद्यार्थ्यांना हा पुरस्कार जाहीर केला जातो. हा पुरस्कार एका वर्षी जास्तीत जास्त चार युवकांना जाहीर केला जातो. या वर्षीच्या, पहिल्याच पुरस्कारासाठी जाधव, बर्वे व सुमंत यांची निवड करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या तिन्ही माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य केले आहे. त्यांनी स्वत:बरोबरच विद्यापीठाचे नावही उंचावले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेणे विद्यापीठाचे कर्तव्यच आहे. त्यामुळेच हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे, असे कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी सांगितले.